Tarun Bharat

मिल्कोटेस्टरचा पासवर्ड आता ‘गोकुळ’कडे

‘तरुण भारत’च्या वृत्तानंतर मिल्कोटेस्टरचे जुने पासवर्ड रद्द : नवीन पासवर्ड केवळ ‘गोकुळ’कडेच राहणार : मिल्कोटेस्टरचा तक्रार असल्यास गोकुळकडे संपर्क साधण्याचे आवाहन

कृष्णात चौगले/कोल्हापूर

दुधाचे फॅट, एसएनएफ तपासण्यासाठी प्राथमिक दुध संस्थांकडून अद्ययावत मिल्कोटेस्टरचा वापर केला जात असला तरी मिल्कोटेस्टरमध्ये फेरफार करून फॅट कमी केले जात असल्याचे वृत्त ‘तरुण भारत’मध्ये 11 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाले होते. ‘मिल्कोटेस्टरचा पासवर्ड दुध संस्थांच्या हातात’ या मथळयाखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गांभिर्याने दखल घेऊन गोकुळकडून सुमारे 3 हजार 500 दुध संस्थांच्या मिल्कोटेस्टरचा जुना पासवर्ड रद्द केला जाणार आहे. यापैकी गेल्या दोन दिवसांत 70 टक्के मिल्कोटेस्टरचे जुने पासवर्ड रद्द केले असून त्यांना नवीन पासवर्ड दिले आहेत. आता हे पासवर्ड केवळ गोकुळकडे राहणार आहेत.

गोकुळच्या काही कर्मचाऱयांनी पासवर्डचा गोलमाल व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिला होता. पण हा पासवर्ड रद्द करण्याच्या कामात काही संस्थाचालक अडथळे निर्माण करत असल्यामुळे पासवर्ड बदलण्याचे काम रखडले होते. पण याबाबत ‘तरुण भारत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गोकुळने पासवर्ड बदलण्याची मोहिम युद्धपातळीवर हाती घेतली आहे. यामध्ये गोकुळचे अधिकारी आणि तांत्रिक कर्मचारी प्रत्येक संस्थेमध्ये जाऊन जुने पासवर्ड रद्द करून नवीन पासवर्ड देत आहेत. पण यापुढे हे पासवर्ड दुधसंस्थांच्या हाती लागू नयेत, यासाठी मिल्कोटेस्टर पुरविणाऱया कंपन्यांकडे न देता ते गोकुळकडेच ठेवले जाणार आहेत. तसेच जे जुने मिल्कोटेस्टर आहेत, त्यामध्ये फेरफार करता येऊ नये यासाठी मशिन सील केले जात आहे. वापरादरम्यान हे सील तुटल्याचे लक्षात आल्यास संबंधित दुध संस्थेवर कारवाई केली जाणार आहे. तसेच यापुढे मिल्कोटेस्टरबाबत उत्पादकांना शंका असल्यास त्याबाबत थेट गोकुळकडे तक्रार नोंद करावी असे आवाहनही गोकुळ व्यवस्थापनाच्यावतीने केले आहे.

फॅटसाठी घेतल्या जाणाऱया दुधाचा प्रश्न अधांतरीच
फॅट तपासण्यासाठी उत्पादकांकडून घेतले जाणारे 50 ते 100 मि.ली.दूध परत न देता ते संस्थेच्या कॅनमध्येच स्वतंत्रपणे ओतले जाते. याबाबत दोन वर्षांपूर्वी तक्रार झाल्यानंतर तत्कालिन सहाय्यक निबंधकांनी (दूग्ध) फॅट तपासण्यासाठी केवळ 5 ते 20 मि.ली. दूध घेण्याच्या प्राथमिक दूध संस्थांना सूचना देण्याबाबत गोकुळ दूध संघाला आदेश दिले होते. त्यानुसार सर्व प्राथमिक दूध संघांना पत्र पाठविले होते. पण आजतागायत या सूचनेनुसार कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आजही हा प्रश्न अधांतरीच राहिला आहे.

काटामारीकडे कोण लक्ष देणार ?
दूध संस्थातील इलेक्ट्रॉनिक वजनकाटे हे 100 मि.ली अचूकतेचे आहेत. त्यामुळे या वजन काटय़ावरील कॅनमध्ये दूध ओतल्यानंतर ते दूध 910 ते 990 मि.ली दरम्यान झाल्यास ते केवळ 900 मिली दिसते. या ठिकाणीही उत्पादकांना सुमारे 50 ते 75 मि.लीचा फटका बसतो. याकडे वैधमापनशास्त्र विभागाचे कचखाऊ धोरण असल्यामुळे शेतकऱयांचे वर्षानुवर्षे नुकसान होत आहे.

‘तरुण भारत’चे आभार
मिल्कोटेस्टरमधील घोटाळ्याबाबत तरुण भारतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गोकुळ प्रशासनाकडून पासवर्ड बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. परिणामी फॅट कमी करून उत्पादकांची केली जाणारी लूट थांबली आहे. त्यामुळे दुध उत्पादकांकडून ‘तरुण भारत’चे आभार मानले जात आहे.

Related Stories

महापुराच्या धास्तीने प्रयाग चिखलीकरांकडून जनावरांचे स्थलांतर सुरु

Abhijeet Khandekar

ड्रग प्रकरण: अभिनेता विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वाच्या घरी सीसीबीचा छापा

Archana Banage

महागावात १.८८ लाखांच्या ५००, २०० आणि १०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त, तिघांना अटक

Archana Banage

राजकीय कोंडीचेच जिल्हय़ातही पडसाद

Kalyani Amanagi

चंदगड पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल परीट निलंबित

Archana Banage

कोल्हापूर : मलकापूर आगारा नजीक अपघातात एकाचा मृत्यू

Archana Banage