पारंपारिक पद्धतीने पंजा विसर्जन मिरवणूक
सांगरूळ / वार्ताहर
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला सांगरूळचा मोहरम (अलावा) उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवारी पारंपारिक पद्धतीने सवाद्य मिरवणुकीने ताबूत विसर्जन करण्यात आले. भर पावसातही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अमावस्यानंतर चंद्रदर्शन पाहून शनिवार दिनांक ३० जुलै रोजी उपसरपंच सुशांत नाळे व गावकामगार पोलीस पाटील यांच्या हस्ते खईत कुदळ मारून मोहरमची सुरुवात झाली याच दिवशी पीर व पंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यानंतर दररोज नियमितपणे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडलेत यामध्ये पंजाभेट दंडवत घालणे ओटी भरणे. यासारख्या धार्मिक कार्यक्रमांचा समावेश होता. सोमवारी मोहरमचा मुख्य दिवस झाला हा दिवस खत्तल रात्र म्हणून साजरा केला जातो. चालू वर्षी श्रावण महिना असल्यामुळे बहुतांशी भाविकांनी घोडा नैवेद्य दाखवणे पंसत केले. मंगळवारी सायंकाळी पारंपारिक पद्धतीने वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने पंजांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी कर्बले खेळणे शिगा लावणे यासारखे पारंपारिक खेळ खेळण्यात आलेत. ट्रस्टी सादिक मुल्ला यांनी सर्व ट्रस्टींच्या सहकार्याने मोहरमचे चांगले नियोजन केले होते.