लसीकरण, आरोग्य तपासणीत चांगली कामगिरी : कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान
प्रतिनिधी/कोल्हापूर
राज्यातील सर्व महापालिकांचे आरोग्य कार्यक्रमातील महत्त्वाच्या कामगिरीच्या आधारावर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत रँकिंग तयार करण्यात येते. ऑगस्ट 2022 च्या रँकिंगमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. याबाबतचे आरोग्य सेवा तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त यांचे पत्र महापालिकेस प्राप्त झाले आहे.
महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सातत्यपूर्ण नियोजनाआधारे शहरातील 3 हॉस्पिटल तसेच 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामार्फत विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये गरोदर माता नोंदणी, प्रसूतीपूर्व तसेच प्रसूतीपश्चात आरोग्य तपासणी, गरोदर माता, 16 वर्षापर्यंतच्या बालकांचे लसीकरण, क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे निर्देशकाआधारे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत रँकिंग तयार करण्यात येते. यानुसार गुणानुक्रमे राज्यातील सर्व महापालिकांमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा दुसरा क्रमांक आला आहे. यासाठी महापालिकेतील प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, नर्स, आशा स्वयंसेविका आदींनी मोलाचे योगदान दिले आहे. कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा एकप्रकारे सन्मान करण्यात आला आहे.
हे ही वाचा : ग्रा.पं.निवडणुकीचे ऑक्टोबरअखेरीस बिगुल
तीन महापालिकांना टाकले मागे
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत रँकिंगमध्ये प्रथक क्रमांकावर सांगली महापालिका आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर महापालिकेचा समावेश आहे. तर पिंपरी चिंचवड, वसई विरार, नागपूर अशा महापालिकांना आरोग्य अभियानात कोल्हापूर महापालिकेने मागे टाकले आहे.
स्वच्छतेत पिछाडीवर… आरोग्य अभियानात आघाडीवर
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कोल्हापूर महापालिकेचा रँक घसरला. देशात 104 तर राज्यात 20 व्या क्रमांकावर कोल्हापूर महापालिका राहिली. या उलट आरोग्य अभियानात राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.