23 जुलै रोजी होणार जाहीर: आयोगाकडून यादी मिळण्यास उशीर झाल्याने निर्णय : 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध
कोल्हापूर,प्रतिनिधी
कोल्हापूर महापालिका निवडणूकीसाठीची (Kolhapur Municipal Corporation Election 2022) प्रारूप मतदार यादी आज शुक्रवारी प्रसिद्ध केली जाणार होती. परंतू निवडणूक आयोगाकडूनच 31 मे 2022 ची अद्ययावत मतदार यादी महापालिकेला मिळण्यास विलंब झाल्याने प्रारूप मतदार यादीचे काम पूर्ण होवू शकलेले नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने यादीच्या कामासाठी मुदतवाढ दिली आहे. आता 23 जुन रोजी प्रारूप मतदार यादी तर 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूकीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू झाली आहे. प्रभाग रचना, आरक्षण जाहीर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला होता. कोल्हापूर महपालिकेसह राज्यातील मुदत संपणाऱ्या इतर महापालिकेंना प्रारूप मतदार यादी 17 जुन रोजी प्रसिद्ध करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. महापालिकेने त्यानुसार कामकाज सुरू आहे. आयोगाकडून 31 मे 2022 पर्यंतची मतदार यादी राज्यातील संबंधित महापालिकेना देण्यास विलंब झाल्याने मुदतीमध्ये प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास मर्यादा आल्या होत्या. यामध्ये कोल्हापूर महापालिकेचाही समावेश होता. राज्य निवडणूक आयोगाने अखेर गुरूवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास 6 दिवस मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा- कोल्हापुरातून रात्री उशिराच्या रेल्वेगाड्या सुरू करणार
त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेवू
कोल्हापूर महापालिकेने जानेवारीपासूनच मतदार यादीचे तयारी केल्याने प्रारूप मतदार यादीचे काम अंतिम टप्प्यात आले होते. आयोगाने मुदतवाढ दिल्याने मिळालेल्या आवधीमध्ये आता प्रारूप मतदार यादीत त्रुटी राहणार नाहीत, कमी हरकती कशा येतील यासाठी मनपाची निवडणूक कामकाज करणारी टिम काम करेल, अशी माहिती उपायुक्त रविकांत आडसुळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध -23 जून
हरकती, सूचना दाखल करणे-23 जुन ते 1 जुलै
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध -9 जुलै