Tarun Bharat

महापालिकेच्या शाळा झाल्या स्मार्ट

Advertisements

58 शाळांमध्ये स्मार्ट टीव्हीः दहा शाळा शंभर टक्के डिजिटल : नवीन शैक्षणिक कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी शाळा सज्ज

अहिल्या परकाळे/कोल्हापूर

महापालिकेच्या शाळांनी काळाबरोबर पावले उचलत शाळा स्मार्ट करण्यावर भर दिला आहे. एकूण 58 शाळांमध्ये लोकसहभागातून स्मार्ट टीव्ही उपलब्ध झाले असून, त्यापैकी दहा शाळा शंभर टक्के डिजिटल झाल्या आहेत. सरकारकडून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याच्या हालचाली असल्याने आता महापालिकेच्या शाळाही स्मार्ट होणार आहेत. त्यामुळे महापालिका शाळांकडे पालकांचा ओढा वाढला असून, यंदा महापालिका शाळांमध्ये 504 विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली आहे.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या आकर्षणामुळे पालक आपल्या पाल्यांना महापालिकेच्या शाळेमध्ये पाठवण्यास धजावत नाहीत. परंतू गेल्या काही वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल पाहिल्यास यामध्ये महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यानीच घवघवीत यश संपादन केल्याचे स्पष्ट होतेय. प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणारे विद्यार्थीही महापालिकेच्या शाळेचेच आहेत. त्यामुळे अलीकडे महापालिका शाळांच्या पटसंख्येत वाढ होत असून टेंबलाईवाडी विद्यामंदिर, जरगनगर शाळा, महात्मा फुले या शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. कोरोना कालावधीत विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘माझा टीव्ही, माझी शाळा’ हा उपक्रम राबवला. यातून स्थानिक वृत्तवाहिनीच्या माध्यमातून शिक्षकांनी तयार केलेले अभ्यासक्रमाचे व्हिडीओ दाखवण्यात आले. हीच खरी ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात महापालिका शाळांनी केली. आता नवीन शैक्षणिक धोरणातील आव्हाने पेलण्यासाठी सर्व शाळा येत्या वर्षभरात शंभर टक्के डिजिटल करण्याचा मानस आहे. शिक्षकांनी आपल्या वाढदिवसानिमित्त, काहींनी आपल्या आईच्या स्मरणार्थ तर काही लोकसहभागातून स्मार्ट टीव्ही आणि वर्ग डिजिटल करून मिळाले आहेत. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे आणि महापालिका प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांनी डिजीटलकडे वाटचाल सुरू केली आहे.

प्रज्ञाशोध परीक्षा, पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी कोल्हापूर महापालिका शाळांचे नाव उज्वल केले आहे. एवढय़ावरच न थांबता पुढे जाऊन विद्यार्थी जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी प्रशासनासह शिक्षक प्रयत्नशील आहेत. या प्रयत्नांना लोकसहभागाची साथ मिळाल्याने हा प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय. एका वर्गात एक स्मार्ट टीव्ही, स्क्रीन लावून संपूर्ण वर्ग डिजिटल झाला तर विद्यार्थ्यांना बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार शिक्षण घेणे सोपे होईल. तसेच नवीन शैक्षणिक धोरणातील नियम व अटींची पुर्तता करीत ऑनलाईन शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी केली जाईल. शाळांसह विद्यार्थी व शिक्षक बचावाचा प्रयत्न शिक्षक , पालक व प्रशासनाने सुरू केला आहे.

वर्षभरात सर्व शाळा अद्ययावत करणार
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने शिक्षण मिळावे म्हणून वर्षभरात महापालिकेच्या 58 शाळा शंभर टक्के डिजिटल करणार आहे. सध्या पालकांचा महापालिकेच्या शाळेकडे ओढा वाढला असून पटसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे. बदलत्या शिक्षण पध्दती लक्षात घेऊन शाळा अद्ययावत करणार.
डी. सी. कुंभार (प्रशासन अधिकारी, महापालिका प्राथमिक शिक्षण समिती)-

पालकांनी करुन दिली संपूर्ण शाळा डिजिटल-
पालकांचा महापालिकेच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. महापालिकेच्या शाळेत उत्तम शिक्षण मिळते अशी विश्वासार्हता काही शाळांनी निर्माण केली आहे. यामुळेच पालकांनी पुढाकार घेत रायगड कॉलनी परिसरातील जोतिर्लिंग विद्यामंदिर संपूर्ण डिजिटल करुन दिली असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लाभ होत आहे.

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दाखवणार रॉकेट प्रक्षेपण
विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच वैज्ञानिक दृष्टीकोन रूजावा यासाठी महापालिकेच्या विविध शाळेतील निवडक 40 विद्यार्थ्यांना तिरूअनंतपूरम येथील इंडियन स्पेस रिसर्च सेंटर दाखवणार आहे. तसेच तेथील रॉकेटचे प्रक्षेपण दाखवून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोगांची माहिती दिली जाणार असल्याचे डी. सी. कुंभार यांनी सांगितले.

Related Stories

शिरोली ग्रामपंचायतीची ‘क’ वर्ग नगरपालिका मागणीसाठी ठराव मंजूर

Sumit Tambekar

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात २२० मिलिमीटर पाऊस

Abhijeet Shinde

कोल्हापूर : भिंती अन् खिडक्यावरही बसणार नॅनो सोलर सिस्टिम

Abhijeet Shinde

शरद साखरचे आगामी गळीतात सात लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट

Abhijeet Shinde

Kolhapur; जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करा- जिल्हाधिकारी

Abhijeet Khandekar

‘स्वराज्य’चे तोरण आणि धोरण उद्या ठरणार?

Kalyani Amanagi
error: Content is protected !!