शिरोळ प्रतिनिधी
चिंचवाड ता ( शिरोळ) येथील ककडेमळा- नंदीवाले वसाहत येथील चंपाबाई भुपाल ककडे वय 65 वर्षे या वृद्ध महिलेच्या अंगावरील साडीच्या पदराने गळा आवळून खून करून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केली असल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणास संशयित ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद अरिहंत उर्फ किरण महावीर चौगुले रा हुपरी यांनी दिली आहे.
शिरोळ पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, सौ चंपाबाई भुपाल ककडे व तिचा पती भुपाल तातोबा ककडे वय 70 वर्ष हे दोघे चिंचवाड ककडे मळा नंदीवाले वसाहत येथील घरात राहात होते तर त्यांचा मुलगा हुपरी येथे राहतो. शनिवार दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील पहिल्या खोलीत झोपलेल्या चंपाबाई ककडे यांना मारहाण केली आणि त्यांच्या अंगावरील साडीच्या पदराने त्यांचा गळा आवळून खून केला. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र बोरमाळ व कानातील सोन्याची फुले असा अंदाजे 80 हजार रुपयांचे दागिने काढून घेतले. यावेळी झालेल्या झटापटीच्या आवाजाने दुसऱ्या खोलीत झोपलेले त्यांचे पती भुपाल तातोबा ककडे यांना जाग आली. चोरट्यांनी त्यांनाही मारहाण करून खोलीत डांबून ठेवून पलायन केले. त्यानंतर भुपाल ककडे यांनी आरडाओरडा केल्याने शेजारचे लोक जमा झाल्यावर ही घटना निदर्शनास आली. या घटनेची माहिती शिरोळ पोलिसांना देण्यात आली घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपअधिक्षक रामेश्वर वैजणे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून शिरोळ ग्रामीण रुग्णालयात मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. तर भुपाल ककडे यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी श्वान पथक ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
खून करून चोरी केल्याच्या प्रकरणामुळे या परिसरात घबराट पसरली आहे
दरम्यान आज रविवार दिवसभर शिरोळ पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री गायकवाड पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजणे यांनी शिरोळ पोलीस ठाण्यास व चिंचवाड येथील घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाबाबत योग्य त्या सूचना करून तात्काळ खुण्याचा शोध घेण्याचे आदेश दिले. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी एकास ताब्यात घेतले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगड्डे पो. हे. कॉन्स्टेबल सागर पाटील पोलीस कॉन्स्टेबल गजानन कोष्टी हे करीत आहेत.