जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
कोल्हापूर / प्रतिनिधी
मालमत्तेच्या वादातून सावत्र आईचा कोयत्याने निर्घुण खून केल्याप्रकरणी एकास जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. 2 बी. डी. शेळके यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रविंद्र पांडुरंग माने (वय 41 रा. पळसंबे ता. गगनबावडा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नांव आहे. सरकार पक्षातर्फे ऍड. अमित आनंदराव महाडेश्वर यांनी बाजू मांडली. 21 जानेवारी 2019 रोजी पळसंबे (ता. गगनबावडा) येथे ही घटना घडली होती.
याबाबत अधिक माहिती की, मालमत्तेच्या कारणातून आरोपी रविंद्र माने व त्याची सावत्र आई प्रगती माने यांच्यामध्ये वारंवार वाद होत असत. या गोष्टीला कंटाळून प्रगती माने 2018 ला मुंबई येथे स्थायिक झाल्या होत्या. त्यानंतर 20 जानेवारी 2019 रोजी त्या पुन्हा पळसंबे या गावी आल्या होत्या. रविंद्र माने याला प्रगती माने आपल्या मुलांचे काही बरेवाईट करेल तसेच आपल्याला राहत्या घरातून बाहेर काढेल अशी भिती वाटत होती. याच कारणातून 21 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास प्रगती माने घरामध्ये एकटय़ाच असल्याचे पाहून रविंद्र माने याने त्यांच्यावर लोखंडी कोयत्याने हल्ला केला.