जयसिंगपूर- नांदणी / प्रतिनिधी
जंगल परिसरातून रस्ता चुकलेल्या गवा रेड्याचे सोमवारी दुपारी नांदणी परिसरात दर्शन झाले. सदरचा गवा रेडा तारे- माणगावे मळ्यातून जयसिंगपूर परिसरात आला. सायंकाळी चकोते शाळेजवळील उसामध्ये रात्री उशिरापर्यंत तो थांबला होता.
सोमवारी दुपारी सांगली- कोल्हापूर महामार्ग ओलांडून तो तारे व माणगाव मळ्यातून नोंदणी जयसिंगपूर रोडवर असलेल्या चकोते शाळेजवळील उसाच्या शेतामध्ये तो दमून स्थिर झाला दुपारपासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतर हा पळत राहिला. गवा दिसल्याने नागरिकांच्या हुल्लडबाजीमुळे तो पळत सुटला. अखेर दमल्यानंतर त्याने उसाचा आसरा घेतला.
शिरोळ तालुक्यातील वन कर्मचारी व कर्मचाऱ्यांचे प्रयत्न अपुरे पडले. त्यानंतर रात्री उशिरा कोल्हापूर येथून वन विभागाचे कर्मचारी व रेस्क्यू टीम दाखल झाल्या. सदरचा गवा दमला असल्यामुळे त्याला विश्रांतीची गरज असल्याचे सांगण्यात आले. त्याची हालचाल सुरू झाल्यानंतर त्याला पुन्हा परतीच्या मार्गाकडे सोडण्यात येणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली. नरंदे परिसरात गेले काही दिवस वास्तव्यात असलेला पाच ते सहा वर्षे वयाचा नर असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी करवीर रमेश कांबळे, वनपाल आर.के. देसा, अरुण खामकर, नवाळे वनरक्षक, वन्यजीव बचाव पथक, शिरोळ पोलीस या ठिकाणी उपस्थित होते.