पुरुष संघानेही पटकावले पाचव्यांदा अंजिंक्यपद, कल्याणी पाटील, श्रीधर निगडे स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू
कोल्हापूर प्रतिनिधी
नंदुरबार येथे झालेल्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट मुलींच्या रग्बी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोल्हापूर जिल्हा महिला संघाने मुंबई सबरबन संघाला 19-5 ट्राय गुणफरकाने पराभूत करुन विजेतेपदाची हॅटट्रीक साधली. कोल्हापूर जिल्हा पुरुष संघानेही अंतिम सामन्यात बहारदार खेळ करुन मुंबई सिटी संघावर 29-7 ट्राय गुणफरकाने विजय मिळवून पाचव्यांदा अजिंक्यपदाची पटकावले. के. डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर या दोन्ही स्पर्धा झाल्या. रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे या दोन्ही स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
नंदुरबार जिल्हा रग्बी असोसिएशनने स्पर्धांचे संयोजन केले होते. तीन दिवस सुरु राहिलेल्या या स्पर्धेत मुलींचे 17 व मुलांच्या 24 संघांनी सहभागी घेतला होता. कोल्हापूर जिल्हा महिला संघाने उपांत्यपूर्व सामन्यात ठाणे जिल्हा महिला संघाला 36-0 ट्रायगुणांनी हरवून उपांत्य फेरी गाठली. नाशिक जिल्हा संघ विरुद्ध कोल्हापूर जिल्हा संघ यांच्यात उपांत्य सामना झाला. या सामन्यात कोल्हापूर संघाने नाशिक संघाला 24-0 ट्राय गुणांनी मात देऊन अंतिम फेरीत प्रवेश केला. कोल्हापूर जिल्हा महिला संघ व मुंबई सबरबन संघ यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात वैष्णवी पाटील, पूजा कुंभार, शुभांगी गावडे, कल्याणी पाटील, शितल शिनगारे या पाच जणींनी मुंबई सबरबन संघाविरुद्ध 19 ट्रायगुण मिळवत कोल्हापूर जिल्हा संघाला विजेतेपेद मिळवून दिले. उपविजेता राहिलेल्या मुंबई सबरबन संघाला केवळ 5 ट्रायगुण मिळवता आले.
अधिक वाचा- बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता, पुढील 72 तास महत्त्वाचे
https://tarunbharat.com/nitish-kumar-says-dont-leave-patna-for-72-hrs-to-mla/
पुरुषांच्या स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने उपांत्यपूर्व सामन्यात उस्मानाबाद जिल्हा संघाला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. कोल्हापूर संघाने उपांत्य सामन्यातही विजयाचा वारू कायम ठेवत नंदुरबार जिल्हा संघावर 26-0 ट्राय गुणांनी दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. मुंबई सिटी संघ व कोल्हापूर जिल्हा पुरुष संघ यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात कोल्हापूर संघाने मुंबई सिटीचा 29-7 ट्राय गुणफरकांनी पराभव करत स्पर्धेचे जेतेपद खिशात घातले. कोल्हापूर संघाला अंतिम सामना जिंकून देत स्पर्धा अजिंक्यपदाचा सरताज मिळवून देण्यासाठी श्रीधर निगडे, विनायक पोवार, सुहास बेनके, पृथ्वीराज पाटील, प्रमोद कांबळे, वल्लभ पाटील व संकेत पाटील यांनी मुंबई सिटीविरुद्ध 29 ट्राय गुण मिळवले. तसेच मुंबई सिटीनेही चांगला खेळ करत कोल्हापूर संघाविरुद्ध 7 ट्राय गुण मिळवले.
बक्षीस वितरण समारंभात कोल्हापूर महिला व पुरुष संघाला मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र असे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याचबरोबर महिला स्पर्धेत कोल्हापूर संघाला सर्वाधिक ट्रायगुण मिळवून दिल्याबद्दल कल्याण पाटीलला आणि पुरुष स्पर्धेत श्रीधर निगडेला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवले. स्पर्धा विजेत्याचे दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून उमेश पाटील व संग्राम कळंत्रे व प्रशिक्षक म्हणून दीपक पाटील यांनी काम पाहिले.