राष्ट्रवादीचा नेता शिंदे गटाच्या वाटेवर : शिरोळमध्ये राष्ट्रवादीचा निष्ठावंत म्हणवणारा नेता शिंदेंच्या छावणीत : दोन मतदारसंघ वगळता इतरत्र राष्ट्रवादी दिशाहिन
कृष्णात चौगले/कोल्हापूर
राज्यातील राजकीय नाटय़ाचे पडसाद जिह्याच्या राजकारणावरही उमटत असून महाविकास आघाडीतील शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसलाही त्याचे धक्के बसत आहेत. गोकुळच्या निवडणुकीत दुखावलेले चंदगडचे राष्ट्रवादीचा बडा नेता सध्या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली. तर स्वतःला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे निष्ठावंत समजणारे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यापूर्वीच शिंदे गटात डेरेदाखल झाले आहेत. परिणामी आगामी काळात या दोन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या घडय़ाळाच्या काटय़ांची दिशा बदलणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या चंदगड तालुक्यात पक्षाच्या दोन्ही गटांतर्गत धुसफूस सुरु आहे. गोकुळ निवडणुकीपासून आमदार राजेश पाटील गट नाराज असून आगामी राजकारणात ते राष्ट्रवादीसोबत राहतील की नाही, याची नेत्यांना शाश्वती नाही. तर राष्ट्रवादीकडून कुपेकर गटाला विचारात घेतले जात नसल्यामुळे त्या गटानेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिरोळमधील आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे राष्ट्रवादीचेच आहेत, असे स्थानिक नेत्यांकडून वरिष्ठ नेत्यांना भासवले जात असले तरी अलिकडच्या काळातील त्यांच्या राजकीय हालचाली व शिंदे गटाशी केलेली जवळीक पाहता ते कधीच राष्ट्रवादीपासून दुरावले आहेत. जिल्हा पातळीवरील नेत्यांच्या सोयीच्या भूमिकेमुळे तेथे ताकदीचा पर्यायी नेता देखील तयार झालेला नाही. परिणामी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीबरोबरच विधानसभा निवडणुकीमध्ये या दोन मतदारसंघात राष्ट्रवादीला उमेदवार नव्हे तर कार्यकर्ता शोधण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
तर चंदगडमध्ये शोधावा लागणार उमेदवार
चंदगड विधानसभा मतदारसंघात आमदार राजेश पाटील व माजी आमदार संध्यादेवी कुपेकर अशा दोन गटात विभागलेल्या राष्ट्रवादीमध्ये नाराजीनाट्य़ सुरु आहे. गोकुळच्या निवडणुकीपासून या दोन गटांतर्गत सुरु असलेला कलह दूर करावा आणि राष्ट्रवादीला एकसंघ करावे अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आहे. त्यानुसार पाटील यांनी कुपेकर यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अंतर्गत गटबाजी संपविण्याची विनंती कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे केली. यावेळी नंदाताई बाभूळकर यांनी मतदारसंघात सक्रीय व्हावे अशी विनंती करून प्रदेशाध्यक्षांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचे संकेत दिले. त्यांच्या या संकेतामधून आमदार राजेश पाटील यांची आगामी राजकीय वाटचाल काय असेल? हे अप्रत्यक्षपणे स्पष्ट झाले आहे. पण बाभूळकर यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये चंदगडमधून राष्ट्रवादीला उमेदवार शोधण्याची वेळ येणार की काय ? अशी स्थिती आहे.
आगामी निवडणुकांमध्ये समजणार राष्ट्रवादीची ताकद
आमदार राजेश पाटील यांना गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीतील पराभवाची आजही सल आहे. त्यांचे मेहुणे खासदार संजय मंडलिक हे सध्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत. भविष्यातील राजकीय वेध घेतल्यास राजेश पाटील हे देखील शिंदे गटात सामील होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. तर शिरोळ विधानसभा मतदारसंघातील आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे यापुढे शिंदे गटाला बळ देणार आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीची किती ताकद आहे ? याचा लेखाजोखा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट होणार आहे.