वाहतूक नियंत्रक पोलिसांची वानवा असल्यामुळे वाहतूकीची गैरसोय
नृसिंहवाडी प्रतिनिधी
सध्या दिवाळीची सुट्टी सुरू असल्याने शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. गुरुवारी या गर्दीने रेकॉर्ड तोडले. यामुळे येथील बहुमजली पार्किंग इमारत वाहनांनी फुल्ल भरली होती. तसेच शिरोळ कुरुंदवाड मार्गावर अनेक वाहनधारकांनी रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केले होते. यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी झाली. मात्र ही कोंडी सोडवण्यासाठी शिरोळ पोलीस ठाण्यामार्फत कोणतीही वाहतूक नियंत्रक पोलिसाची नेमणूक न केल्यामुळे वारंवार वादावादीचे प्रसंग वाहनधारकातून घडत होते.
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी ही दत्ताची राजधानी म्हणून संबोधली जाते. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रींच्या मनोहर पादुकांच्या दर्शनासाठी येथे सातत्याने गर्दी होते. सध्या दिवाळीच्या सुट्टीचा हंगाम सुरू असल्याने व काल गुरुवार असल्याने येथे मोठ्या प्रमाणात श्रीचरण दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. यामुळे मंदिर परिसर दक्षिण उत्तर घाट गर्दीने फुलून गेला होता दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दर्शन व्यवस्थेसाठी वेगवेगळ्या तीन रांगांची व्यवस्था दत्त देवस्थानमार्फत करण्यात आली होती.
आज सकाळपासूनच एसटी बस खाजगी वाहने दुचाकी चार चाकी तसेच टेम्पो ट्रॅव्हलर आधी वाहनातून भाविक दर्शनासाठी येताना दिसत होते. सकाळी नऊ नंतर ही गर्दी वाढतच गेली येथे कन्यागत महापर्व काळ च्या निधीच्या माध्यमातून शासनामार्फत बहुमजली पार्किंग इमारत बांधण्यात आली आहे. येथे साधारणता 250 ते 300 वाहने पार्क होऊ शकतात मात्र आजची गर्दी रेकॉर्ड ब्रेक होती हे संपूर्ण बहुमजली इमारत वाहन पार्क करून भरले होते. यामुळे शिरोळ कुरुंदवाड मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनधारकांनी आपले वाहने पार्क करून तेथून चालत येणे पसंत केले. शिरोळ कुरुंदवाड मार्गावर अनेक वाहनधारकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने पार्क केल्यामुळे येथील स्वागत कमरेजवळ सातत्याने वाहतुकीची कोंडी होत होती. यामुळे वाहनधारकांच्यामध्ये वारंवार वादावादीचे प्रसंग घडत होते. मात्र येथे कोणीही वाहतूक नियंत्रक पोलीस नसल्यामुळे बराच वेळ वाहनधारकांना ताटकळत थांबावे लागत होते. तर यातूनच एखादी मोठी गाडी आली किंवा एसटी बस स्वागत कमानीजवळ आली तर मोठाच गोंधळ उडत होता असे प्रसंग दिवसभर वारंवार घडत होते.
आजच्या गर्दीमुळे येथील प्रसिद्ध मिठाई व्यापारी तसेच हॉटेल खानावळ अन्य दुकानदार यांच्यात मोठी उलाढाल झाली. दोन वर्षाच्या कोरोनाच्या निर्बंधानंतर गर्दी झाल्याने व्यापारी वर्गात समाधान दिसत होती. आजची गर्दी लक्षात घेऊन दत्त देव संस्थांमार्फत दर्शन रंगांची व्यवस्था केली होती. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच नित्य महाप्रसाद व्यवस्था करण्यात आली होती याचा लाभ ही शेकडे भाविकांनी घेतला.
कोल्हापूर जोतिबा येथे वाहतूक नियंत्रक पोलीस इथे का नाही ?
दिवाळीच्या सुट्टी निमित्त येते गर्दी झाल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला होता. मात्र येथील स्वागत कमानीजवळ सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी वाहनधारकांच्या वादावादी सोडवण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक नियंत्रक पोलीस नसल्याने ही घटना वारंवार घडत होती याबाबत अनेक वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कोल्हापूर ज्योतिबा या क्षेत्राप्रमाणे नृसिंहवाडी येथे सातत्याने वाहनधारकांची गर्दी होत हे पोलीस प्रशासनाला माहीत असून देखील कोल्हापूर ज्योतिबाप्रमाणे येथे वाहतूक नियंत्रक पोलीस का नियुक्त केला नाही असा सवाल अनेक वाहनधारकांनी व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.