Tarun Bharat

Kolhapur; शहरवासीय जलमुखांवर…पात्रता फेरीतच यंत्रणा नापास

मान्सूनपुर्व पावसानेच दाखवला ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है

कोल्हापूर : संतोष पाटील

नैसर्गिक पाणी निचरा पध्दतीलाच हरताळ फासल्याने शहरवासीय जलमुखाच्या तोंडावर असल्याचे गुरूवारी सायंकाळी धुव्वाधार पावसाने पुन्हा एकदा सिध्द केले. मुंबई-चेन्नई शहरात येणाऱ्या जलप्रलयास धुव्वाधार पावसाच्या जोडीला समुद्राच्या भरती-ओहोटीची गणिते अवलंबून असते. मात्र, कोल्हापूर शहराच्या एका टोकापासून पंचगंगा नदी पात्रापर्यंत सरासरी 20 फुटांचा नैसर्गिक डहाळ असूनही अवघ्या तासाभराचा पाऊस शहरात पाणी-पाणी करत असेल तर निश्चितच भविष्यकाळातील हा धोक्याचा इशारा आहे. पावसाचा अभ्यास न करता टाकलेले भराव, प्रमुख 13 नाल्यांसह 703 लहान नाले आणि चॅनेल्समध्ये भरलेला गाळ व नाल्याची कमी झालेली रुंदी, बुजलेले अनेक नाले, अवास्तव पध्दतीने झालेले नागरीकरण, रस्ते प्रकल्पामुळे शहराची वाढलेली दोन फुटांनी उंची, 100 कोटी रुपये खर्चून केलेल्या अतिरिक्त पावसाळी पाणी नियोजनाचा उडालेला फज्जा आदींमुळे शहरवासीय जलमुखावर असल्याचे या पावसाने पुन्हा अधोरेखित केले आहे. या घटनेने पात्रता फेरीतच यंत्रणा नापास झाल्याचे सिध्द झाले आहे. मान्सूनपुर्व पावसानेच हा ट्रेलर दाखवला असून पिक्चर अभी बाकी है.

नागरीकरण जीवावर
प्रशासनाच्या नोंदीनुसार शहरातील 15 पारंपारिक ठिकांणी पुराचे पाणी येते. मात्र, गेल्या काही वर्षात शहरातील वळवलेले नाले, पुर नियंत्रण रेषेलगत टाकलेले भराव, रस्त्यांची वाढलेली उंची, नदी क्षेत्रातील बांधकामे आदीमुळे पुर किंवा ढगफुटी सारख्या घटनांनी जनजीवन धोक्यात येत आहे. शहराचा परीघ अवघा सहा किलोमीटरचा आहे. यातच पंचगंगा नदीने शहराला जवळपास वळसा घातला आहे. परिणामी, आजूबाजूला उपनगरे व शेतवडीत मोठय़ा प्रमाणात कॉलन्या वसल्या. वाढत्या नागरिकरणाला थोपवून पुरापासून शहरवासियांचा बचाव व्हावा यासाठी 2005 मध्ये आलेल्या महापुराची रेषा अंतीम मानत रेडझोन आखण्यात आला. या रेषेपलीकडे बांधकाम करणे किंवा भराव टाकण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र पुररेषेला खेटून भराव टाकत मोठय़ा प्रमाणात बांधकामे झाली. कॉलन्या वसल्या. या कॉलन्या व नागरी वस्तीच्या सेवेसाठी रस्त्यांची बांधणीही करण्यात आली. हे सर्व करताना अतिरिक्त पावसाच्या पाणी वहनाचा विचारच केला नसल्याचे या पावसात सिध्द झाले.
नाले बुजले

शहरातून जाणारे जयंती नाल्यासह बारा नाले अतिरिक्त पावसाचे पाणी नदीपर्यंत वाहून नेण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडतात. या जोडीला शहरात रस्त्यावर पाणी आणू शकतील, असे 703 लहान नाले आणि चॅनेल्स आहेत. यांची परिपूर्ण स्वच्छताच झाली नसल्याचे या पावसाने दाखवून दिले. अनेक खासगी जागेतून जाणाऱया नाल्यांना बंदिस्त करण्यासह काही ठिकाणी त्यांचा नैसर्गिक प्रवाह वळवला आहे. तर काही ठिकाणी या नाल्याचे मोठय़ा गटारीत रुपांतर केले गेले. वाढत्या नागरिकरणाचे व नैसर्गिक पाणी निचऱयाशी केलेल्या छेडछाडीचे दृश्यपरिणाम आता पुढे येऊ लागले आहेत. परिणामी शहरात अनेक दुकाने आणि घरांत पाणी शिरले.

रेडझोनचा फज्जा
जलसंपदा विभाग व महापालिका यांनी 1999 व 2005 साली आलेल्या महापुराचा अभ्यास करुन पुररेषा नक्की केली आहे. महापुराचा धोका पातळीचा विचार करुन शहरातील नदी पात्राशेजारी कुठपर्यंत बांधकामे करायची, याची रेषा निश्चित आहे. ही पातळी विचारात घेऊन नदी शेजारी व नाल्याशेजारील बांधकामांसाठी केलेली नियमावली अनेक ठिकाणी कागदावरच आहे. बांधकामांच्या भरावामुळे पाण्याला अतिरिक्त फुग येऊन नागरी वस्तीत पाणी शिरू नये, यासाठी प्रामाणिक सर्वेक्षण करुन आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे.

तीन लाख लोक नाल्याभोवती

पाचगाव, मोरेवाडी, कळंबा, आर. के. नगर, मंडलिक पार्क, साईक्स एक्स्टेन्शन, रेल्वे स्टेशन, शिवाजी पार्क, सी वॉर्ड, लक्ष्मीपुरी, कनाननगर, ताराबाई गार्डन, शाहूपुरी, राजारामपुरी, शिवाजी उद्यमनगर, वाय. पी. पोवारनगर, यादवनगर, प्रतिभा नगर, जवाहरनगर, सुभाषनगर आदी शहराच्या मध्यवस्तीतून जयंती नाला वाहतो. शहरातील साडेपाच लाख लोकसंख्येपैकी तब्बल 2 लाख 90 हजार लोकसंख्या नाल्याभोवती व परिसरात आहे. न्यू शाहूपुरी, गुलाबनगर, रायगड कॉलनी, रामानंद नगर, हॉकी स्टेडीयम, कसबा बावडय़ातील रेणुका मंदिर, आयसोलेशन हॉस्पिटल, महालक्ष्मीनगर पुल, हुतात्मा पार्क पुल परिसर, जयंती नाला परिसर, शेळके पुल परिसर, कुंभार गल्ली, विल्सन पुल, संभाजी ब्रिज परिसर, बुधवार पेठेतील काही भाग, राजहंस प्रिंटींग प्रेस परिसर, शास्त्राrनगर आदी परिसरात एक दोन दिवसांच्या पावसात पाणी शिरत आहे. नाल्यावरील बांधकामामुळे या भागांना पुराचा धोका वाढला आहे. याशिवाय काही नवीन कॉलन्यांमध्ये तीस वर्षात कधीही पावसाचे पाणी शिरले नाही, त्या भागातही पाणी येत आहे.

रस्ते प्रकल्पातील त्रृटींनी डोकेवर काढले

शहरात 49.95 किलोमीटरचे रस्ते बांधणी एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांर्गत करण्यात आली. जुन्या रस्त्यावर नवीन रस्त्यांची केलेली बांधणी जमिनीशी समतल नाही. त्यामुळे बिघडलेल्या प्लिंथ लेव्हलमुळे पाण्याचा निचरा होत नाही. पावसाळी पाणी नियोजनाच्या दृष्टीने आवश्यक वॉटर टेबल व रचना रस्त्यांशी संलग्नग्न नाही. जमीन, रस्ता व फुटपाथ संलग्नग्न नाहीत. ज्या रस्त्यांची उंची पुढील 100 वर्षात वाढणे अपेक्षित होते ते रस्ते एका दमात दोन ते चार फुटांनी वाढले. ठेकेदार आणि यंत्रणेची मिलीभगत असल्याने रस्त्यावर रस्ते असे थर रचत शहराची अनैसर्गिक उंची वाढवण्याचे काम केले जात आहे. नैसर्गिक नाले व निचऱयातून पावसाचे जाणारे अतिरिक्त पाणी रस्त्याच्या वाढलेल्या उंचीमुळे अडवले जात आहे. परिणामी दुकानांत आणि घरात पाणी शिरत आहे.

नाले सफाईचा फार्स
महापालिकेने पावसाळी नाले सफाई व स्वच्छतेची कामे पूर्ण केली नसल्याने त्याचा पाण्याच्या निचऱयावर परिणाम झाला. एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांर्तगत शहरात 98 किलोमीटरचे नाले बांधण्यात आले. मात्र हे नाले शेवटपर्यंत मोठय़ा नाल्यांना जोडलेले नाहीत. याशिवाय अनेक ठिकाणी अर्धवट सोडलेली कामे व काटकोनात वळवलेले नाले यामुळे यातून सहजरित्या पाणी वहन होत नाही. यामध्ये मोठय़ा प्रमाणात खरमाती व कचरा साचल्याने अनेक ठिकाणी ते बंदच आहेत. त्यामुळे सर्वच प्रमुख रस्त्यातील चौकात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले.

72 कोटी पाण्यात; शहराचे झाले डबके

2009 साली मुंबईत आलेल्या जलप्रलयानंतर पावसाचे अतिरिक्त पाणी वाहून नेणारी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी शासनाने नगरोत्थान योजनेतून कोल्हापूर महापालिकेला 72 कोटींचा निधी दिला. यासह वेळोळी केलेला खर्च पाहता आतापर्यंत अतिरिक्त पाणी वहनासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. यातून शहरात पावसाळी पाणी नियोजन योजना राबवली. रस्ते विकास प्रकल्प वगळता इतर प्रमुख 45 किलोमीटरच्या रस्त्यांवर दुतर्फा मोठय़ा पाईपलाईन टाकून त्या पाईपमधून रस्त्यावरील पाणी जवळच्या नाल्यात सोडण्याची योजना सपशेल फसवी ठरली आहे. या पाईपलाईनचे काम करताना प्लिंथ लेव्हलचा विचार केला नाही. कोटय़ावधी रुपयांची ही पाईपलाईन रस्त्याखाली गडप झाली असून कुचकामी ठरली आहे.

पब्लिक ऍड्रेस सिस्टीम कधी उपयोगात येणार?

संपूर्ण शहर आणि जिह्यात नागरिकांशी एकाच वेळी एखाद्या आपत्त्कालीन अलर्ट देण्यासाठी पब्लिक अलर्ट सिस्टीम बसवली आहे. महापुरात याचा उपयोग होईल, असे सांगितले जाते. वेधशाळेकडून पावसाची अलर्ट प्रशासनाला मिळत असतात. या पीए सिस्टीमव्दारे वादळी वारा, विजा आणि पावसाचे अलर्ट देण्याची गरज आहे. पाऊस पडणार असल्याचे अगोदरच समजल्यानंतर नागरिक घराबाहेर पडण्यापूर्वीच अधिक काळजी घेतील.

वाहतुकीचा बोजवारा
वादळी वाऱ्याने शहरात किमान 700 ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. पाऊस थांबल्यानंतर अचानक मोठय़ा संख्येने वाहने रस्त्यावर आली. त्यामुळे शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. वाहतुकीला शिस्त लावणारी यंत्रणा कुठेही कार्यान्वित दिसत नव्हती. वादळी वारा अथवा पाऊस ही आता आपत्ती ठरणार असून अशा वेळी सुक्ष्मनियोजन करुन यंत्रणा सतर्क ठेवण्याची गरज आहे.

Related Stories

शिवतीर्थावरील मनसेच्या बैठकीत ‘जय श्रीराम’चा नारा

Archana Banage

इस्लामपूर आगारात शिवसेना व रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यात दगडफेक

Archana Banage

शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

लॉकडाऊनसंदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेणार – मंत्री मुश्रीफ

Archana Banage

डोडामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला अटक

datta jadhav

मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंदा

Patil_p