कोल्हापूर : प्रतिनिधी
सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून तृतीयपंथीय व्यक्तींसाठी National Portal For Transgender Persons राष्ट्रीय पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज करण्याबाबतची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेणेसाठी तसेच तृतीयपंथीय असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र असणे आवश्यक असून याकरीता जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय नागरिकांनी राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज सादर करून सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन समाजकल्याणचे उपायुक्त उमेश घुले यांनी केले. ते कोल्हापूरात तृथियपंथीयांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना बोलत होते.
जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हयामध्ये तृतीयपंथीय कल्याण व हक्काचे संरक्षण अंतर्गत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. या समितीने जिल्हयातील तृतीयपंथीयांची माहिती संकलित करून २० तृतीयपंथीयांना शेळीपालन या प्रशिक्षणाकरीता जिल्हा कौशल्य विकास केंद्र, प्रधानमंत्री कौशल्य विकासमधून ०६ तृतीयपंथीयांना मेकअप आर्टिस्ट या प्रशिक्षणाकरीता निवड केली आहे. तक्रार निवारण समितीच्या या उपक्रमाबद्दल महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय कल्याण मंडळाच्या सदस्या मयुरीताई आळवेकर यांनी आभार व्यक्त केले. आजच्या कार्यक्रमामध्ये काही तृतीयपंथीय नागरिकांना प्रातिनिधीक स्वरूपामध्ये तृतीयपंथीय असलेबाबतचे ओळखपत्र व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमात संग्राम संस्थेच्या रियाज मणेर यांनी तृतीयपंथीय घटकांचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासनाची प्रक्रिया सुरू असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य आणि सहायक समाजकल्याण आयुक्त विशाल लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कोल्हापूर जिल्हयातील तृतीयपंथीय व्यक्तींची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसलेने त्यांच्यासाठी नावीन्यपूर्ण व कौशल्य विकासाच्या योजना राबविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. तरी राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी यापुढेही सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या वतीने शिबीरे आयोजित करण्यात येईल आणि या उपक्रमात सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग आपल्या सोबत असेल असे सांगताना या शिबीरांचा कोल्हापूर जिल्हयातील जास्तीत जास्त तृतीयपंथीय व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रासह आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन विशाल लोंढे यांनी केले आहे.
आजची कार्यशाळा सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, विचारे माळ, कोल्हापूर या ठिकाणी पार पडली. या कार्यशाळेसाठी जातपडताळणी विभागाचे संशोधन अधिकारी सचिन साळे, तसेच जिल्हयातील तृतीयपंथीय भगीनी तसेच मुस्कान संस्था व मैत्री संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते . कार्यालय अधिक्षक सचिन पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले, श्रीमती सुरेखा डवर यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आभार सचिन कांबळे यांनी मानले. सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी समाजकार्य विभाग, सायबर महाविद्यालय तसेच समाज कार्य विभाग, शिवाजी विद्यापीठ कडील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, समाजकल्याण निरिक्षक कल्पना पाटील, दत्तात्रय पाटील, निलम गायकवाड यांचे या कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले.