वडगाव पोलिसांची कारवाई, सातारा जिह्यातील तिघांना अटक
पेठवडगाव : प्रतिनिधी
पेठवडगाव – वाठार रस्त्यावर संशयास्पदरित्या फिरणाऱया दुचाकीस्वारास पोलिसांनी अडवून माहिती घेतली. यावेळी त्यांच्याकडे गावठी पिस्तुल व गांजा अशा वस्तू आढळून आल्या. पिस्तुल, मोटारसायकल, अंमलीपदार्थ असा 90 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मनोज खांडेकर, अविनाश इंगळे, आशुतोष इंगळे (तिघे रा. साठेनगर रेठरे बुद्रुक, ता. कराड, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. वडगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करण्यासाठी पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर यांच्या आदेशानुसार पीएसआय गिरीष शिंदे, पोलीस अमलदार दादा माने, संदीप गायकवाड, प्रमोद चव्हाण हे पेट्रोलिंग करत होते. दरम्यान वडगाव वाठार रस्त्यावर सिमेंट फॅक्टरीजवळ मोटारसायकलवरून तीन इसम संशयास्पदरित्या वाठारच्या दिशेने जाताना दिसले. त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना पकडून त्यांच्याकडे तपास केला असता विनापरवाना गावठी पिस्तूल, गांजा, चिलीम, मोबाईल अशा वस्तू सापडल्या. पोलिसांनी मोटारसायल, पिस्तुल, गांजा अशा सुमारे 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.