संघ मालकांकडून कोट्यावधी रूपयांचे मानधन मिळवले
संग्राम काटकर, कोल्हापूर
ज्या कबड्डीपटूच्या अंगात क्षमता आहे तोच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रो-कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट खेळू शकतो, हे प्रो-कबड्डीचे हे एक साधे सूत्र आहे. या सूत्रामध्ये कोल्हापूर जिह्यातील 19 कबड्डीपटूंनी आपणाला बरोबर फिट करून राष्ट्रीय पातळीवर आयोजित केल्या जात असलेल्या प्रो-कबड्डी लीगमधील सहभागी विविध संघात स्थान मिळवले आहे. चंदगडच्या सुरज देसाई व सिद्धार्थ देसाई या सख्ख्या भावांनी तर कमालच केली आहे. सिद्धार्थने विविध संघातून प्रो-कबड्डी लीगमध्ये खेळताना 4 कोटी 50 लाख रुपयांचे तर सुरजने दिल्ली दबंग संघातून खेळताना 55 लाख रुपयाचे मानधन प्राप्त केले. उर्वरित 17 जणांनी ही 8 ते 30 लाख रुपयांचे मानधन विविध संघांमधून खेळण्यासाठी मिळवले आहे. सुरजने प्रो-कबड्डी लीगमध्ये तेलगू टायटन्सकडून प्रथमच खेळताना चढाई व डिफेन्समधून मिळवलेले 27 गुणांचे रेकॉर्ड आजही कायम आहे.
टीव्हीवरील एका वाहिनीने दहा वर्षापासून प्रो-कबड्डी लीग कॉम्पिटिशनचे आयोजन करुन देशाच्या कबड्डीचा नूरच पालटून टाकला. बहुतांश ठिकाणी मातीच्या मैदानात खेळली जाणारी ग्रामिण ढंगातील कबड्डी झगमगाटीच्या वातावरणातील मऊ मऊ मॅटच्या मैदानावर प्रो-कबड्डी या नावाने आली. या मैदानात कबड्डीचा सामना खेळताना ज्या कबड्डीपटूला चढाई आणि बचावचा योग्य पद्धतीने मेळ घालता येतो तोच प्रो-कबड्डी लीगमध्ये सर्वोत्तम खेळ करू शकतो आणि आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो, असेही अधोरेखित झाले. 2014 साली भारतात सुरु झालेल्या प्रो-कबड्डी लीगला भारतीय क्रीडा परंपरेत आणि जनमाणसात लोकप्रिय व्हायला फारसा वेळ लागला नाही. प्रो-कबड्डी लीग फक्त भारतातच नव्हे तर जगातही लोकप्रिय झाले. क्रिकेटमधील आयपीएलनंतर भारतात सर्वाधिक लोकप्रिय झालेले दुसरी क्रीडा स्पर्धा म्हणून प्रो-कबड्डी लीगकडे पाहिले जाते. जसे क्रिकेटचे आयपीएल प्रसिद्ध आहे, ते प्रो-कबड्डी लीगला केएल असे संबोधले जाते. प्रो-कबड्डीत प्रवेश करण्याचा राजमार्ग शिरोलीच्या सागर खटाळे या नवभारत शिरोली क्लबच्या खेळाडूने कोल्हापूर जिह्यातील खेळाडूंना सर्वप्रथम दाखवला. कबड्डीचा सामन्यात डिफेन्स करण्यात माहिर असलेल्या सागरने पुणेरी फलटण या संघात स्थान मिळवून मोठे मानधन मिळवले. त्याने मिळवलेले मानधन कबड्डीपटूंसह जिह्यातील सर्वच खेळांच्या खेळाडूंमध्ये चर्चेचा विषय बनले होते. शिवाय पुणेरी फलटण या संघात सागरने केलेली एन्ट्री ही कोल्हापूर जिह्याची प्रो-कबड्डीमधील एंट्री ठरली. सागरपासून प्रेरणा घेतलेल्या कोल्हापूर जिह्यातील कबड्डीपटूंनाही प्रो-कबड्डी एन्ट्री करण्याचे वेध लागले.
प्रो-कबड्डी लीगपर्यंत जाण्यासाठी खूप खूप मेहनत करावी लागते हे ही तितकेच सत्य आहे. महाराष्ट्रातील सर्व जिह्यांमध्ये कबड्डी असोसिएशनच्या वतीने खुल्या गटांत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत विरुद्ध संघाच्या खेळाडूने केलेल्या चढाईला उत्कृष्टपणे डिफेन्स करणाऱ्या, विऊद्ध संघाच्या चढाई केलेल्या खेळाडूला शिताफीने पकडणाऱ्या आणि विऊद्ध संघावर चपळाईने चढाई कऊन खेळाडूंना बाद करण्यात पटाईत असलेल्या खेळाडूंचा मिळून जिल्हा संघ तयार केला जातो. हा जिल्हा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठवला जातो. याही स्पर्धेत अत्यूच्च खेळी करणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्र संघासाठी निवडले जाते आणि जे खेळाडू उत्कृष्ट खेळ कऊन राष्ट्रीय स्पर्धा गाजवतात त्यांना प्रो-कबड्डीसाठीच्या ऑक्शनसाठी निवडण्यात येते. जो खेळाडू ऑक्शनमध्ये असतो त्याची मैदानातील कामगिरी, तो कोणत्या क्लबकडून किती वर्षे खेळतो याची माहिती प्रो-कबड्डीतील संघ मालक व व्यवस्थापनांकडून मागवली जाते. संबंधित खेळाडू सामन्यात चांगला डिफेन्स करतो, विरुद्ध संघावर चपळाईने चढाई करतो, डिफेन्स व चढाईत अष्टपैलू आहे अशीही माहिती संघ मालकांकडे पाठवली जाते. अशा सगळ्या टप्प्यात कोल्हापूर जिह्यातील 19 खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाच्या जोरावर प्रो-कबड्डी लीगसाठी आपली काबिलियत सिद्ध करून विविध संघांमध्ये स्थान मिळवले आहे. संघ मालकांनीही त्यांच्याकडील डिफेन्स, चढाई आणि पकडीचे कौशल्य पाहून त्यांना लाखो रुपये मानधन देण्याची तयारी दाखवली. चढाईमध्ये अतिउत्कृष्ट असलेल्या सिद्धार्थ देसाई या तरुण कबड्डीपटूने यु-मुब्बा, तेलगु टायटन्स, हरियाणा स्टीलर, दबंग दिल्ली या संघांमध्ये स्थान मिळवून प्रो-कबड्डी लीग स्पर्धेचे मैदानात तर गाजवलेच शिवाय संघांकडून तब्बल 4 कोटी 50 लाख रुपयांपर्यंतचे मानधन मिळवून महाराष्ट्रातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून लौकिक मिळवला. सिद्धार्थचा सख्खा थोरला भाऊ सुरज देसाई यानेही आपल्यातील गुणवत्तेच्या जोरावर दबंग दिल्ली व तेलगू टायटन्स या संघात स्थान मिळून 1 कोटी रुपयांची कमाई केली. सामन्यांमध्ये चढाई केलेल्या विरुद्ध संघाच्या खेळाडूला पकडण्यात उत्कृष्ट असलेल्या ऋतुराज कोरवी (शिरोली) यानेही गुजरात फॉर्च्युन जाएंट या संघातून दोन व तेलगू टायटन्सकडून 1 एकदा प्रो कबड्डी लीगमध्ये खेळत तब्बल 80 लाख रुपयांचे मानधन संघ मालकांना आपल्याला देण्यास भाग पाडले. याशिवाय प्रो-कबड्डी प्रतिनिधित्व करण्यास लायक ठरलेल्या अन्य कबड्डीपटूंनीही 12 संघामध्ये स्थान मिळवत 8 लाखपासून ते अगदी 30 लाख रुपयांपर्यंतचे मानधन संघ मालकांकडून मिळवून नव्या दमाच्या कबड्डीपटूंसमोर आपली प्रेरणा ठेवली आहे. जमेची बाजू म्हणजे कबड्डीच्या जोरावर सुरज देसाईला सेना दलातील सेवेची आणि सुरजचा भाऊ सिद्धार्थला रेल्वेमध्ये नोकरी मिळाली आहे. ऋतुराज कोरवीला आनंद पाटीलला कस्टममध्ये, तुषार पाटील व अक्षय जाधवला इन्कम टॅक्समध्ये आणि सौरभ पाटीलला इंडियन पोस्ट खात्यात नोकरी मिळाली आहे. अन्य कबड्डीपटूंनीही विविध क्षेत्रात नोकऱ्या मिळवून आपल्या चरिचार्थांचा मार्ग पकडला आहे. या खेळाडूंना भलेही प्रो-कबड्डीच्या जोरावर विविध क्षेत्रात नोकऱ्या मिळवल्या असल्या तरी त्यांनी गेल्या पंधरा वर्षापासून रोज सकाळी आणि संध्याकाळी केलेला सरावालाही नजरेआड करता येणार नाही. नव्या दमाच्या खेळाडूंना प्रो-कबड्डी लीग सहभागी व्हायचे असेल तर मात्र गेल्या दहा वर्षात प्रो-कबड्डी लीगममध्ये स्थान मिळवलेल्या कोल्हापूर जिह्यातील खेळाडूंना आपले प्रेरणास्थान मानावे.
प्रो-कबड्डी लीगमध्ये खेळलेल्या खेळाडूंचे मुळचे संघ असे :
सागर खटाळे : नवभारत शिरोली क्लब, शिरोली
आनंद पाटील : शिरोली
अक्षय जाधव : अनोजे
ऋतूराज कोरवी : छावा कबड्डी संघ, शिरोली
दादासाहेब पुजारी जय शिवराय क्रीडा मंडळ, शिरोली
सौरभ पाटील : हिंदवी स्पोर्टस् क्लब, कौलव
साहिल पाटील : शिवमुद्रा स्पोर्टस् क्लब, कौलव
तेजस पाटील : सह्याद्री क्रीडा मंडळ, कोल्हापूर
प्रतिक पाटील : सह्याद्री क्रीडा मंडळ, कोल्हापूर
ओंकार पाटील : सह्याद्री क्रीडा मंडळ, कोल्हापूर
तुषार पाटील : शाहू क्रीडा मंडळ, सडोली
महेश मगदूम : शाहू क्रीडा मंडळ, सडोली
राजवीर पाटील : शाहू क्रीडा मंडळ, सडोली
आदित्य पोवार : जय हिंद क्रीडा मंडळ, इचलकरंजी
सौरभ फगरे : जय हिंद क्रीडा मंडळ, इचलकरंजी
आर्यवर्धन नवाळे : स्वराज्य स्पोर्टस् क्लब, इचलकरंजी.
सुरज देसाई : सह्याद्री क्रीडा मंडळ, कोल्हापूर