अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने मिरवणूक; ढोल-ताशा, धनगरी ढोल, लेझीम, हलगीचा समावेश
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापुरात सोमवारी शिवराज्याभिषेक दिन सोहळा अपूर्व उत्साहात साजरा झाला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
शहरात शिवराज्याभिषेक दिनी विविध तालीम संस्था, मंडळांच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपतींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहानाधिष्ठित पुतळयाचे पूजन करून मंगळवार पेठेतून या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.
मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, मावळयांच्या वेशभूषेतील कार्यकर्त्यांचा समावेश होता. धनगरी ढोल, हलगी, लेझीम आणि, ढोल-ताशा पथक सहभागी झाले होते. मिरवणुकीत मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली. घडसी समाजाचे ब्रास बँड पथन सहभागी झाले. कणेरी येथील मुलींच्या लेझीम पथकाने लक्ष वेधून घेतले. मंगळवार पेठेतून ही मिरवणूक मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौकमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. येथे मिरवणुकीची शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन सांगता झाली.
मिरवणुकीत ऍड. गुलाबराव घोरपडे, वसंतराव मुळीक, बबनराव रानगे, शशिकांत पाटील, बाळासाहेब भोसले, सुखदेव बुध्याळकर, सोमनाथ घोडेराव, सचिन चव्हाण, मारुती मोरे, संतोष सावंत, अनंत म्हाळुंगेकर, कादर मलबारी, शैलजा भोसले, दीपा डोणे, संयोगिता देसाई, निलम मोरे, बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, तय्यब मोमीन, व्ही. के. पाटील, मान्यवर सहभागी झाले होते.
लक्षवेधी प्रबोधनात्मक फलक
मिरवणुकीत राजर्षी शाहू चित्ररथ, रिक्षावर प्रबोधनात्मक फलकातून सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला होता.