पाचगाव, वार्ताहर
कोल्हापूर: आर. के. नगर , पाचगाव, मोरेवाडी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मात्र पोलीस चौकी नेहमी बंद अवस्थेतच आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. आर. के. नगर येथे करवीर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस चौकी आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून ही पोलीस चौकी बंद अवस्थेतच असते. यामुळे या परिसरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक चोरीच्या घटनांचा अद्याप शोध लागलेला नाही. काही महिन्यांपूर्वी येथील पोलीस चौकीमध्ये रात्रंदिवस पोलीस असत यामुळे परिसरातील चोरीच्या घटनांमध्ये घट झाली होती. मात्र सध्या ही पोलीस चौकी बंदच असल्यामुळे या परिसरात फाळकुट दादांची दहशत वाढली आहे .
तीन दिवसांपूर्वी पाचगाव मुख्य रस्त्यावर रात्री बाराच्या सुमारास तरुणांच्या गटात जोरदार हाणामारी सुरू होती. याची माहिती देण्यासाठी काही नागरिक पोलीस चौकी जवळ आले. मात्र यावेळी पोलीस चौकी बंदच होती. म्हणून करवीर पोलीस स्टेशनला रात्री बाराच्या सुमारास नागरिकांनी फोन केला. मात्र अनेक वेळा रिंग होऊन ही करवीर पोलीस स्टेशन मधून हा फोन रिसीव करण्यात आला नाही. एखादी अनर्थ घटना घडल्यानंतरच पोलिसांना जाग येणार काय? असा प्रश्न यामुळे नागरिकांमधून विचारण्यात येत आहे.
हेही वाचा- शाब्बास ! कुरुंदवाडच्या चहा विक्रेत्याची मुलगी बनली आंतरराष्ट्रीय वेटलेफ्टर विजेती
पाचगाव आर. के. नगर, मोरेवाडी,कळंबा परिसरात वारंवार घडणाऱ्या भुरट्या चोऱ्या, घरफोडी यासारख्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी. येथील पोलीस चौकी पूर्ववत सुरू करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे .
हेही वाचा- बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरुचं; शाहूवाडी तालुक्यात पुन्हा शेळी आणि वासरु फस्त
आर. के.नगर येथे कायमस्वरूपी अधिकृत पोलीस चौकी व्हावी
आर के नगर , पाचगाव , कळंबा परिसरात उपनगरांची संख्या झपाट्याने वाढत आहे या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आर. के. नगर येथे कायमस्वरूपी अधिकृत पोलीस चौकी व्हावी,अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे .