मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आयोजन; निष्ठा रॅलीच्या पार्श्वभूमीवर क्रांतीरॅलीविषयी उत्सुकता
कोल्हापूर प्रतिनिधी
क्रांती दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्यासाठी कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने आज 9 ऑगस्ट रोजी क्रांती रॅलीचे आयोजन केले केले आहे. सकाळी 11 वाजता दसरा चौक येथून क्रांती रॅलीला सुरूवात होणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर एकप्रकारे शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे चित्र आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर काही दिवसांपूर्वी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिकांनी निष्ठा रॅली काढली होती. आता मुख्यमंत्री शिंदे यांना पाठबळ देण्यासाठी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली क्रांती रॅली आयोजित केली आहे. यातून ठाकरे आणि शिंदे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन पाहणास मिळणार आहे.
रॅलीच्या प्रारंभी जिह्यातील दहा ज्येष्ठ शिवसैनिकांच्या वतीने क्रांती ज्योत प्रज्वलित करून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. दसरा चौक येथून या दुचाकी रॅलीस सुरवात होणार आहे. दसरा चौक मार्गे – अयोध्या टॉकीज, बिंदू चौक, देवल क्लब, मिरजकर तिकटी, दैवज्ञ बोर्डिंग, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, साकोली कॉर्नर, ताराबाई रोड, महाद्वार रोड, पापाची तिकटी, जोशी गल्ली कॉर्नर, शहीद भगतसिंग चौक, शिवालय कार्यालय, कोल्हापूर महानगरपालिका मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक असा रॅलीचा मार्ग असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅली सांगता करण्यात येणार आहे. या रॅलीस कोल्हापूर जिह्यासह शहरातील तमाम कट्टर शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.