शिवसेना नेते संजय राऊत यांना माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा; आमदार देवेंद्र भुयार यांची हाकलपट्टी केल्याचे केले स्पष्ट
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी भाजपला मतदान केल्याचे वक्तव्य चुकीचे आहे. भुयार यांनी कोणाला मतदान केले याच्याशी आपल्याला काही देणे-घेणे नाही. त्यांची यापुर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हाकलपट्टी केली आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी घोडेबाजार आमदारांमध्ये स्वाभिमानीचे नाव घेवून बदनामी करु नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पराभवाचा धक्का बसला. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक मोठय़ा फरकाने विजयी झाले. निकालानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पराभवाचे खापर छोटे पक्षांसह काही अपक्ष आमदारांवर फोडले. यामध्ये स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांचाही उल्लेख केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उल्लेखाने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी चांगलेच संतापाले. त्यांनी राऊत यांचा आरोप खोडून काढत स्वाभिमानीची बदनामी थांबविण्याचा इशारा दिला. माजी खासदार शेट्टी म्हणाले, देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी संघटनेतून यापुर्वीच हाकलपट्टी केली आहे. त्यामुळे त्यांनी कोणाला मतदान केले याच्याशी स्वाभिमानी संघटनेला काही देणे-घेणे नाही. राऊत यांनी घोडेबाजार आणि दलबदलू राजकारणात स्वाभिमानीचे नाव घेवून बदनामी करु नये. भुयार यांचा स्वाभिमानी संघटनेशी काहीही संबंध नसल्याने त्यांच्या नावापुढे राऊत यांनी स्वाभिमानीचे आमदार असा उल्लेख करुन संघटनेची बदनामी करु नये, असा इशारा दिला आहे.