खोची/वार्ताहर
बुधवारी खोची परिसरात किरकोळ सरी वगळता पावसाची उघडीप होती. मात्र चांदोली धरण क्षेत्रात पडत असलेला पाऊस व तिथून होणारा विसर्ग यामुळे या परिसरातून वाहत असलेल्या वारणा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. पाणी नदीपात्रा बाहेर विस्तीर्ण होऊ लागले असून अनेक शेतात शिरले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. कोल्हापूर सांगली जिल्ह्यांना जोडणाऱ्या खोची- दुधगाव दरम्यानच्या नवीन पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासनाने बॅरॅकेट्स लावली आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी कुंभोज, हातकणंगले, तसेच आष्टा या मार्गे सुरु झाली आहे.
भैरवनाथ मंदिर परिसरात पाणी आल्याने या ठिकाणी स्मशानभूमीत जाणारा रस्ता बंद झाला आहे. तसेच या ठिकाणी पाणी पसरू लागल्याने या भागातील नागरिक सतर्क झाले आहेत. वाढत्या पाणी पातळीवर ते लक्ष ठेवून असून प्रसंगी आपला संसार हलवण्याच्या तयारीत आहेत. तसेच या वाढत्या पूर परिस्थितीवर प्रशासनही लक्ष ठेवून आहे.
भेंडवडे येथे गावालगत पाणी आल्याने या ठिकाणाचे नागरिक सतर्क झाले आहेत. वाढत्या पाणी पातळीवर प्रशासन लक्ष ठेवून असून नागरिकांच्या सतत संपर्कात आहेत. दरम्यान, वाढती पाणी पातळी, महापूराच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल शिखरे यांनी खोची व भेंडवडे येथे भेट देऊन आरोग्य विषयक सुविधा व अडचणी याबाबत आढावा घेतला व मार्गदर्शन केले. तसेच पूररेषेतील गरोदर महिलांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना केल्या.