शाहूवाडी/प्रतिनिधी
मलकापूर (ता.शाहूवाडी) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वरिष्ठ कार्यालयाकडून मजूर करून झाल्यानंतर विनात्रुटी पुरवणी बिले काढण्याच्या कार्यवाहीसाठी मलकापूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशितोष अरूण तराळ (वय ३८, सध्या रा. शासकीय वसाहत मलकापूर ग्रामीण रूग्णालय मुळ रा. शिव-शंकर वसाहत एस. के. काॅलेजच्या पाठीमागे कुरूंदवाड ता.शिरोळ) यास लाच लुचपत विभागाच्या पथकाने सावळा रचून पाच हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
मिळालेली माहिती अशी की, ३१ मे रोजी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे तक्रार दिली. तक्रारी नुसार आज पडताळणी केली असता पडताळणीमध्ये आरोपी लोकसेवक डॉ. आशितोष तराळ यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती नंतरच्या लाभांचा प्रस्ताव पुणे कार्यालयाकडून मंजूर होऊन आलेनंतर पुढील कार्यवाही करणेसाठी, तक्रारदार यांची इतर प्रलबिंत असलेली पुरवणी बिले विनात्रुटी पुढे पाठविण्यासाठी पाच हजार रुपये व वरिष्ठांच्या सेवानिवृत्तीच्या निरोसंमारभासाठी सात हजार रूपये अशी बारा हजार रूपये लाचेची मागणी करून आज रोजी सेवानिवृत्तीच्या कामाचे पाच हजार रूपये मागणी करून ते घेऊन येण्यासाठी सांगीतल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचून तक्रारदारांकडून डॉ. तराळ यांना पाच हजार रूपये लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडले.
याबाबत शाहूवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईत पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.नितीन कुभांर, सहा.पो. नि. संजिव बंबरगेकर, पो.ना. विकास माने, सुनिल घोसाळकर, पो.कॉ. रूपेश माने, पो.हे.कॉ. सुरज अपराध अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी या कारवाईसाठी परिश्रम घेतले.