शिरोळ प्रतिनिधी
महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी पतीच्या निधनानंतर गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे, कपाळावरील कुंकू पुसणे यासह अन्य अनिष्ट, रूढी, पंरपरा, रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय शिरोळ नगरपालिकेनेच्या विशेष सभेत घेण्यात आला. असा निर्णय घेणारी शिरोळ नगरपालिका ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली नगरपालिका ठरली आहे
शिरोळ नगरपालिकेच्या सभागृहात आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते. विशेष सभेमध्ये विधवा महिलांना समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी जनजागृती करणे तसेच पतीच्या निधनानंतर कुंकू पुसणे, जोडवी काढणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे या अनिष्ट रूढी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
उपनगराध्यक्ष तातोबा पाटील यांनी सूचक तर त्यास नगरसेविका कमलाबाई शिंदे यांनी अनुमोदन दिले. हेरवाड गावच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला. तसा ठराव एकमताने संमत करण्यात आला. शिरोळ नगरपरिषदेने ऐताहासिक असा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या सभेस नगरसेवक सर्वश्री व सर्व नगरसेविका मुख्याधिकारी तैमुर मुलानी उपस्थित होते.