कोल्हापूर हूपरी रस्त्यावर आंदोलन
उचगाव/ वार्ताहर
हुपरी कोल्हापूर रस्त्यावर उचगाव हायवेपुल ते गडमुडशिंगी कमान मार्गावर मोठे मोठे खड्डे पडले असुन या खड्डे चुकविण्याच्या नादात छोटे मोठे अपघात होत आहेत. शिवसेनेने यापूर्वी ही खड्डे मुजवले नाहीतर त्या खड्ड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा फलक लावण्याचे आंदोलन करू असा इशारा दिला होता. पण ठोस उपाययोजना न केल्यामुळे करवीर शिवसेनेच्या वतीने खड्ड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा फलक लावण्याचे आंदोलन करण्यात आले.
हुपरी कोल्हापूर हा राज्य मार्ग असल्याने येथे हुपरी, कोडोली, गडमुडशिंगीसह कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड आहे. तसेच सुत मिलचे कंन्टेनर, स्कूल बसेस अश्या मोठ्या रहदारीचा हा मार्ग असल्याने सदर भागातील गणेश मुर्तीही ने-आण ह्या मार्गावरून होणार आहेत. त्या बाबत दि.२६/०७/२०२२ रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर यांना या बाबतचे निवेदन सादर केले होते. परंतु मोठ्या प्रमाणात असणाऱ्या रस्त्यावर खड्डे मुजवण्याची कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.
यापुढे चांगल्या पध्दतीने खड्डे मुजविण्याचे काम झाले नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट,उपतालुकाप्रमुख विक्रम चौगुले, अपंग सेनेचे संदीप दळवी, राहुल गिरुले, संतोष चौगुले, फेरीवाला संघटनेचे कैलास जाधव व बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, विराग करी, महेश खांडेकर, बबलू मोरे, प्रफुल्ल घोरपडे, बाबुराव पाटील, सचिन नागटीळक,राजू राठोड,शफीक देवळे,इमाम पठाण, मोहन आवळे, उल्फत मुल्ला, प्रतिक गोलपे आदी उपस्थित होते.