अत्याधुनिक विश्लेषणात्मक उपकरण सुविधा केंद्रप्रमुख डॉ. आर. जी. सोनकवडे यांची माहिती
प्रतिनिधी/कोल्हापूर
स्तुति उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठातील अत्याधुनिक विश्लेषणात्मक उपकरण सुविधा केंद्र ( DST SAIF CFC)uee सुमारे अडीच कोटी रूपये मंजूर झाले आहेत. देशातील 28 राज्यांपैकी महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, झारखंड राज्यांत तर 8 केंद्रशासित प्रदेशापैकी दिल्ली आणि चंदीगड या दोन ठिकाणी या उपक्रमाला निधी मिळाला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या सहयोगाने या प्रकल्पाकरिता 14 विविध संस्थांनी स्तुति कार्यक्रम घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे विद्यापीठाचे नाव देशभर जाईल. अथक प्रयत्नाने हा प्रकल्प मंजूर झाला आहे, अशी माहिती डॉ. आर. जी. सोनकवडे यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठाच्या अत्याधुनिक विश्लेषणात्मक उपकरण सुविधा केंद्रातर्फे आपत्कालीन अभ्यासक्रम, कार्यशाळा, विविध उपकरणे आणि विश्लेषणात्मक तंत्राबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी स्तुती उपक्रम सुरू केला आहे. मानवी संसाधन तयार करणे व सर्वांना मुक्त प्रवेश, देशभरात पायाभूत सुविधांच्या पुरवठय़ाचे विस्तृतीकरण वाढवून देशभरात ज्ञान क्षमता वाढवणे, हा मुख्य उद्देश आहे. स्तुती योजने अंतर्गत शैक्षणिक संस्थांमधील संशोधन विकास, सुविधांचा विस्तार केला जातो. सात दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रत्येक विद्यापीठ/शैक्षणिक संस्थांना शिवाजी विद्यापीठामार्फत प्रत्येक संस्थेला जवळपास 8 लाख 83 हजार 500 रुपये हस्तांतरित केले जाणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत काश्मीर, गोवा , नागपूर, मणिपूर, लखनौ उत्तर प्रदेश, गुवाहाटी आसाम, राजस्थान, केरळ, कर्नाटक, गुजरात, हैदराबाद, तामिळनाडू, उत्तर बंगाल पाँडिचेरी अशा विविध 18 विद्यापीठाच्या समन्वयाने प्रत्येकी सात दिवसांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाईल. त्यापैकी 14 संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे विद्यापीठातील अत्याधुनिक विश्लेषणात्मक उपकरण सुविधा केंद्राचे अधिविभागप्रमुख आहेत. भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक असून, ’आंतर राष्ट्रीय त्वरक केंद्र’, नवी दिल्ली येथे वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून काम केले आहे. बाबासाहेब भीमराव आंबेडकर मध्यवर्ती विद्यापीठ लखनऊ येथे स्कूल फॉर फिजिक्सचे डीन होते. राज्यस्तरीय, केंद्रीय, डीमड् विद्यापीठातील वैधानिक समितीचे सदस्य होते. त्यांना अध्यापनातील 24 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांनी अनेक विद्यापीठ व वैज्ञानिक संघटनांमध्ये वैविध्यपूर्ण कार्य केले आहे. या अनुभवाचा फायदा ’स्तुति’ उपक्रमासाठी होत आहे. विद्यापीठात नवोन्मेष जागृत करणारे प्रकल्प सुरू आहेत. त्याला विविध संस्थांकडून निधी उपलब्ध होत आहे. डॉ. सोनकवडेंचे विविध तज्ञांकडून कौतुक होत असून, त्यांचे अनुकरण करण्याचा सल्लादेखील दिला जातो. या उपक्रमांतर्गत कॉलेजसह विद्यापीठातील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी देशभरातील शास्त्रज्ञ, मंत्री, राज्याचे सचिव उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सहभागासाठी पात्रता व निकषः व्यक्तीचा मूळ वंश भारतीय असावा. किमान शैक्षणिक पात्रता-पदव्युत्तर पदवी (विज्ञान), बी.टेक.( टेक्नॉलॉजी). प्राध्यापक, संशोधक, पोस्ट डॉक्टरेट फेलो, संशोधन-विकासमध्ये सक्रिय सहभागी होणारे उद्योजक. यजमान संस्था वगळता इतर संस्थांकडून 3 पेक्षा जास्त व्यक्तींना प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार नाही.
स्तुती उपक्रमासाठी मान्यता आनंदाची गोष्ट
1962 मध्ये शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाल्यापासून ते आजपर्यंत विद्यापीठाच्या जडणघडणीत सर्व कुलगुरू, प्राध्यापक, कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थ्यांचे योगदान आहे. ‘स्तुती’ उपक्रमासाठी विविध आयआयटी, केंद्रीय व राज्य विद्यापीठांकडून स्वीकृती मिळणे ही विद्यापीठासाठी सन्मानाची गोष्ट आहे.- डॉ. डी. टी. शिर्के (कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ)
स्तुती प्रशिक्षण उपक्रमाचे वेळापत्रक
काश्मीर विद्यापीठात 23 ते 29 मे, वेल्लोर इन्स्टिट्य़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे 4 ते 10 जुलै, आय.आय.टी. जोधपूर येथे 8 ते 14 ऑगस्ट, डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर, केंद्रीय विद्यापीठात 22 ते 28 ऑगस्ट, बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी, गोवा कॅम्पस येथे 5 ते 11 सप्टेंबर, मंगलोर विद्यापीठ, मंगलोर, कर्नाटक येथे 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, केरळ विद्यापीठ, केरळ येथे 10 ते 16 ऑक्टोबर, आयआयटी, इंदूर येथे 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर, उत्तर बंगाल विद्यापीठ, दार्जिलिंग येथे 14 ते 20 नोव्हेंबर नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे 5 ते 11 डिसेंबर हे प्रशिक्षण कार्यक्रम होतील. या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सोनकवडे हे प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.