उत्तर, दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये पदाधिकारी बदल; शहर समन्वयक म्हणून हर्षल सुर्वे यांची निवड
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेनेकडून पदाधाकरी बदल करण्यात आले आहेत. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून नवीन पदाधिकाऱयांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. शहरप्रमुख पदी सुनील मोदी (कोल्हापूर उत्तर विधानसभा), रविकिरण इंगवले (कोल्हापूर दक्षिण विधानसभा) यांची निवड करण्यात आली. तर शहर समन्वयक म्हणून हर्षल सुर्वे यांची निवड झाली.
राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी भेट घेवून बंडखोरांची शिवसेनेतून हाकलपट्टी करण्याची मागणी केली होती. पवार यांनी केलेल्या मागणीनंतर केवळ तीन दिवसात शहर शिवसेनेत मोठ्य़ा प्रमाणात पदाधिकारी बदल करण्यात आले. रविकिरण इंगवले यांचे शहरप्रमुख पद अचानकपणे काढून घेण्यात आले होते. मात्र नवीन निवडींमध्ये इंगवले यांना पुन्हा शहरप्रमुख पद देण्यात आले. तर जयवंत हारुगले, शिवाजीराव जाधव यांचे शहरप्रमुख पद काढून घेण्यात आले.
अन्य पदाधिकारी असे : उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट (कोल्हापूर दक्षिण, उचगांव, मुडशिंगी, उजळाईवाडी जि.प. मतदार संघ), अवधुत साळोखे (कोल्हापूर दक्षिण पाचगांव, निगवेखालसा, गोकुळ शिरगांव जि.प. मतदार संघ) यांची तर शहर संघटक पदी प्रतिज्ञा उत्तुरे (कोल्हापूर उत्तर विधानसभा), प्रिती क्षीरसागर (कोल्हापूर दक्षिण विधानसभा) यांची निवड करण्यात आली आहे.