श्रीमंत शाहू छत्रपतीना कसबा बावड्यातील अशांत मोरेच्या अनोख्या शुभेच्छा
कसबा बावडा प्रतिनिधी
रक्ताच्या नात्यापालिकडेही मनातील आदर, प्रेम, आणि श्रद्धा असणाऱ्यांप्रति एक आगळे वेगळे अतूट नाते निर्माण होते. या नात्याचा एक भाग म्हणजे अशांत मोरे याने महाराजांना त्यांच्या वाढदिनी दिलेल्या शुभेच्छा. 7 जानेवारी 2023 रोजी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस शहरातील विविध कार्यक्रम, उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रत्येक जण आपापल्या परीने श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करताना दिसले. या सर्वांप्रमाणेच आणखी एका कसबा बावड्यातील मायक्रो पेंटिंग आर्टिस्ट अशांत मोरे याने आपल्या रक्ताने श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची प्रतिमा रेखाटून महाराजांना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कोल्हापूर कलाकारांची भूमी आणि याच कलाकारांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देणारे, आश्रय देणारे महान राजे म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज. आज त्याच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज असलेल्या श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांचा वाढदिवस. यानिमित्ताने कसबा बावड्यातील अशांत मोरे याने स्वतःच्या रक्ताने महाराजांची प्रतिमा रेखाटून महाराजांबद्दल आदर, प्रेम, श्रद्धा व्यक्त केली.
अशांत मोरे हा मायक्रो पेंटिंग आर्टिस्ट तसेच उत्तम रांगोळी कलाकार तर आहेच पण नावाजलेले सर्पमित्र, प्राणी मित्र म्हणून देखील त्यांची ओळख आहे. अशा विविध कला जोपासणाऱ्या कसबा बावडा येथील तरुण कलाकाराने शाहुजी महाराजांना दिलेल्या या अनोख्या शुभेच्छा लोकांमध्ये कौतुकाचा विषय ठरत आहे.