अधिक्षक अभियंता अंकुर कावळे
कोल्हापूर : प्रतिनिधी
कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वासाहतीतील ग्राहकांच्या वीज विषयक समस्या प्राधान्याने सोडवू, असे अधिक्षक अभियंता मा.श्री.अंकुर कावळे यांनी आश्वस्त केले. मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले यांचे शिष्टमंडळासमवेत महावितरण मंडळ कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत मॅकच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न व मागण्यांबाबत तपशीलवार चर्चा झाली.
कागल-हातकणंगले औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून विद्युत उपकेद्रांकरीता भुखंड बदलून मिळाल्याने लवकरच डी व जी ब्लॉककरीता नवीन 33/11 विद्युत उपकेंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करू. ए, बी व सी ब्लॉकमध्ये स्विचींग स्टेशन उभारणी, महावितरणचे स्वतंत्र कार्यालय या संदर्भातील प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर करण्यात येतील. एन-डीडीएफ योजनेतील कामांच्या रकमेचा परतावा, विद्युत शुल्क माफी रक्कम परतावा प्रकरणी पाठपुरावा करण्यात येईल, असे कावळे यांनी बैठकीदरम्यान स्पष्ट केले.
महापारेषणकडे वाढीव 100 एमव्हीए क्षमतेचे रोहित्रासाठी पाठपुरावा सुरू
कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत महापारेषण कंपनीच्या उपकेंद्रात क्षमतावाढ होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण अनेक कारखानदार वीज भार क्षमता उपलब्ध नसल्याने अनेक दिवसांपासून वीज जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत, असे शिष्टमंडळाने अधिक्षक अभियंता यांचे निदर्शनास आणून दिले. त्या संदर्भाने महापारेषण कंपनीकडे पाठपुरावा सुरू असून अति उच्च दाब उपकेंद्रातील वाढीव 100 एमव्हीए क्षमतेचे रोहित्र लवकरात लवकर बसविण्यासाठी प्रयत्न करु, असे कावळे यांनी सांगितले.
या बैठकीस कार्यकारी अभियंता सुनिल शिंदे, मॅकचे अध्यक्ष संजय पेंडसे, उपाध्यक्ष यशवंत पाटील, संचालक .हरिश्चंद्र धोत्रे, उद्योजक शकृष्णा मसुरकर, वसंत वरूटे, तानाजी पाटील, उपविभागीय अभियंता विनोद घोलप, सहाय्यक अभियंता विना मटकर, महेश पाटील यांची उपस्थिती होती.