विसर्जन मिरवणूकीत रस्त्यात ठिय्या मारणे, पोलिसांशी हुज्जत घातल्याचाही प्रकार
कोल्हापूर प्रतिनिधी
साउंड सिस्टीम रात्री 12 वाजता बंद करण्याच्या आदेशाचे उल्लंघन करुन रात्री 2 वाजता साउंड सिस्टीम लावल्याप्रकरणी 13 जणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये एका तालमीच्या पदाधिकाऱ्यांसह सिस्टीम ऑपरेटरचाही समावेश आहे. या सर्वावर विसर्जन मिरवणुकीत रस्त्यावर बसून मार्ग बंद करणे आणि पोलिसांशी वाद घालणे या कलमांन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक वाचा- लेसरचा प्रकाशझोत पडला महागात; गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर नेत्र रूग्णांत वाढ
रोहित वसंतराव माने, अजिंक्य दत्तात्रय शिद्रुक, वैभव संजय चव्हाण, निखिल दिलीप तिबिले, निखिल अशोक राबाडे, यश चंद्रकांत चव्हाण, विपुल विजय साळोखे, प्रेम योगेश येळावकर, आकाश रामचंद्र वर्णे, वैभव शिवाजी मोरे, रोहित ऊर्फ गोटय़ा शिवाजी गाडगीळ (सर्व रा. उत्तरेश्वर पेठ), सिस्टीम ऑपरेटर संग्राम पाटील, अमित पाटील यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये रात्री बारा वाजेपर्यंत साउंड सिस्टीम लावण्यास शासनाने परवानगी दिली होती. त्यानुसार शहरातील गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये सर्व तालीम मंडळांनी साउंड सिस्टीम बंद केली होती. मात्र शहरातील एका तालमीने रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास महाद्वार ते गंगावेश मार्गावरील रस्यावर साउंड सिस्टीम सुरु केली. रस्त्यामध्ये बसून रस्ता बंद करून इतरांची अडवणूक केली. यावेळी रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांशी वाद घालून झटापट केली. यामध्ये पोलीस अंमलदार संभाजी माने यांच्या पायास दुखापत झाली. पूर्ण महाद्वारोड रात्री बाराला बंद झाला. पण एकटय़ा वाघाने रात्री दोनला साऊंड वाजवला आणि गाजवला पण, लावली ताकद दिल दाखवून’ अशा आशयाचा मजकूर असलेला व्हिडीओ व्हायरल केला. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अंलदार शिवाजी पाटील यांनी दिली आहे.