धान्यांसाठी फेऱ्या; सुमारे साडे पाच लाख रेशनधारकांना प्रतिक्षा
प्रवीण देसाई कोल्हापूर
केंद्र सरकारकडून दिले जाणारे मोफत धान्य वेळेवर मिळत नसल्याने रेशन ग्राहकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या महिन्यापासून ही अनियमितता आल्यामुळे काही ठिकाणी रेशन दुकानदार व ग्राहकांमध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत. यामध्ये सरकारने लक्ष घालून हे धान्य वेळेवर मिळण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सुमारे साडेपाच लाख रेशनकार्डधारकांचे याकडे डोळे लागून राहिले आहेत.


कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांना दिलासा मिळावा, यासाठी दोन वर्षांपासून केंद्र सरकारने मोफत धान्य द्यायला सुरुवात केली आहे. वेळोवेळी त्याला मुदतवाढ दिली आहे. सध्या कोरोनाचे मोठे संकट नसले तरी ही योजना सुरु आहे. गेल्या दोन वर्षात वेळेत रेशनचे हे धान्य ग्राहकांना मिळत होते. परंतु गेल्या महिन्यापासून यामध्ये अनियमितता आली आहे. हे धान्य वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. प्रति व्यक्तीला 1 किलो गहू व 4 किलो तांदूळ मोफत धान्य माध्यमातून दिले जाते. जिह्यात सुमारे साडेपाच लाख रेशन कार्डधारक आहेत. त्यासाठी दर महिन्याला सुमारे 13 हजार टन धान्य प्राप्त होत असते.
सध्या विकतचे धान्य ग्राहकांना वेळेवर मिळत आहे. परंतु मोफत धान्यांसाठी ताटकळत बसावे लागत आहे. विकतच्या धान्याबरोबरच हे मोफतचे धान्य मिळावे, अशी मागणी आहे. मात्र मोफत धान्य वितरणामध्ये अनियमितता असल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही ठिकाणी रेशन दुकानदार व ग्राहकांमध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत. पावसाळा सुरु असून संभाव्य पूराचे संकटही आहे. त्यामुळे धान्याची बेगमी करुन ठेवण्यासाठी सर्वसामान्य ग्राहकांची हालचाल सुरु आहे. त्यासाठी सरकारने गांभिर्याने लक्ष घालून मोफत धान्य नियमित वितरण होण्याबाबत कार्यवाही करावी, असा सूर उमटत आहे.
केंद्राकडून सुरु असलेल्या मोफत धान्य योजनेचे धान्य वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्याचे ग्राहकांना वितरणही वेळेवर होत नाही. रेशन दुकानदार व ग्राहकांमध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत. यासंदर्भात पुरवठा विभागाच्या अधिकाऱयांची भेट घेऊन मोफत धान्य पुरवठा नियमित होण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
–कॉ. चंद्रकांत यादव, अध्यक्ष, रेशन बचाव समिती
मोफत धान्य वितरणात गेल्या महिन्यापासून अनियमितता आल्याची वस्तुस्थिती आहे. परंतु मोफतचे धान्य गोंदिया येथून येत असल्याने तेथून ते येण्यास उशीर लागत आहे. त्यामुळे हे धान्य दुकानदार व ग्राहकांना मिळण्यात अनियमितता येत आहे. पुढील महिन्यापासून हे धान्य वेळेवर मिळू शकेल.
–दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी