-पाचवीचे 41.64 तर आठवीचे 28.33 टक्के विद्यार्थी
-गेल्या दहा वर्षापासून कोल्हापूर प्रथम क्रमांकावर कायम
प्रतिनिधी,कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 31 जुलै रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर झाली. या अंतरिम गुणवत्ता यादीत दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल स्थानावर आहे. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत 21593 पैकी 8991 विद्यार्थी तर आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत 12120 पैकी 3434 विद्यार्थ्यांनी पात्रता यादीत नाव कमावले आहे. गुणवत्ता यादीतील हरकतीनंतर किमान एक महिन्याने अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द होणार आहे.
पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गेल्या दहा वर्षापासून कोल्हापूर जिल्हय़ाने आपले स्थान कायम ठेवले आहे. विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कोल्हापूर महामालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक विशेष प्रयत्न करतात. त्यामुळेच पाचवी शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत कोल्हापूर प्रथम, सिंधुदुर्ग व्दितीय आणि सातारा जिल्हय़ाने तृतीय क्रमांक पटकावला. तर आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर प्रथम, धुळे व्दितीय आणि मुंबई वेस्ट तृतीय क्रमांक पटकावला आहे.
विद्यार्थ्यांनी आपली हरकत शाळा लॉगीनवर 17 नोव्हेंबरपर्यंत नोंदवायची आहे. हरकतीची छाननी 30 दिवसात पूर्ण करून अंतिम गुणवत्ता यादी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. यशस्वी सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व त्यांना प्रोत्साहन देणाऱया सर्व घटकांचे जिल्हा परिषदेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षेत सरकारी शाळांनी आपला दबदबा निर्माण केल्याने विद्यार्थी संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे शिक्षक दरवर्षी वेगवेगळय़ा संकल्पना राबवत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात सर्वोत्परी मदत करतात. म्हणूनच गेल्या 10 वर्षापासून कोल्हापूरने गुणवत्ता यादीतील आपले स्थान कायम ठेवले आहे.
सर्वांच्या प्रयत्नाने यंदाही कोल्हापूर प्रथम
अहोरात्र कष्ट घेवून मार्गदर्शक शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी ही यशाची परंपरा कायम ठेवली आहे. त्यांना प्रोत्साहन देणारे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व पाठीवर शाब्बासकी देणारे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांचे योग्य नियोजन आणि मार्गदर्शनाने नेहमीप्रमाणे राज्यात कोल्हापूर जिल्हा गुणवत्ता यादीत यंदाही अव्वल आहे.
संजयसिंह चव्हाण (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद)
पाचवी आणि आठवीमधील पात्रता यादीतील विद्यार्थी संख्या
पाचवी
परीक्षार्थी पात्र अपात्र टक्के
21593 8991 12602 41.64
आठवी
परीक्षार्थी पात्र अपात्र
12120 3434 8686 28.33