महसूल कर्मचारी संघटनेची मागणी : जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर
प्रतिनिधी/कोल्हापूर
पुरवठा विभागाकडे समायोजित करण्यात आलेले महसूल आस्थापनेच्या कर्मचार्यांना मूळ महसूल विभागाकडेच वर्ग करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे बुधवारी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना सादर करण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे की, जिल्हाधिकार्यांनी 3 ऑगस्ट 2022 rच्या आदेशानुसार महसुल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना अन्न पुरवठा व नागरी संरक्षण विभागाकडे समायोजित करणेत आलेले आहे. परंतु प्रशासकीय कामकाज सोयीचे होण्यासाठी पुरवठा विभागात काम करण्यास इच्छुक असलेल्या कर्मचार्यांचीच सेवा विकल्प घेऊन तात्पुरत्या स्वरुपात वर्ग करावी ही विनंती आहे. मुळातच महसुलचे कर्मचारी संख्या कमी असल्याने पुरवठा विभागात समायोजित केलेल्या प्रत्येक कर्मचार्यास किमान 3 ते 4 संकलनाचे कामकाज करावे लागणार आहे. त्यामुळे कर्मचायांवर मानसिक व शारीरिक ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी पूर्वी असलेल्या आकृतीबंधानुसारच कर्मचारी देऊन पुरवठा विभागाचे कामकाज सुरु ठेवावे. अन्यथा सुधारीत आकृतीबंधानुसार पुरवठा विभागाचे कर्मचारी नेमून आम्हाला मूळ महसुल विभागाकडे वर्ग करावे.
शिष्टमंडळात राज्य कार्याध्यक्ष विलास कुरणे, अविनाश सुर्यवंशी, जिल्हाध्यक्ष सुनील देसाई, सरचिटणीस अकिल शेख, विजय बुराण, आदित्य कांबळे, विनायक लुगडे आदींचा समावेश होता.