कोल्हापूर प्रतिनिधी
राजोपाध्येनगर येथील बिडी कामगार वसाहतमध्ये मदिना मस्जित सुन्नत जमातच्यावतीने पवित्र रमजान ईद दिवशी स्तुत्य उपक्रम राबविला. एका गरीब कुटुंबातील 15 वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलाच्या औषधोपचारासाठी मदत करत समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तसेच या कुटुंबास आठवडयाच्या प्रत्येक शुक्रवारी आर्थिक व गृहउपोयगी साहित्य मदत स्वरुपात देत आहेत.
देवकर पाणंद येथील राजलक्ष्मी नगरमध्ये प्रकाश पाटील त्यांच्या कुटुंबांसह राहतात. त्यांची घरची परिस्थिती अगदी बेताची आहे. प्रकाश पाटील व त्यांची पत्नी आरटीओ ऑफिस आवारत चहाची टपरी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पण सध्या त्यांचा मुलगा आदित्य (वय 15 वर्ष ) याला सहा महिन्या पूर्वी कॅन्सरचा आजार झाल्याचे निदान झाले. या आजावरील खर्च आवाक्याबाहेर आहे. आदित्यच्या औषधोपचारासाठी पैशाची गरज आसल्याचे सुन्नत जमाअतच्या पदाधिकाऱ्यांना समजले. यावर कमिटीने त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. कमिटी आठवडयाच्या प्रत्येक शुक्रवारी आर्थिक व गृहउपेगी साहित्य स्वरूपात मदत देत आहे. तसेच रमजान ईदचे औचित्य साधून औषधोपचारासाठी आर्थिक मदतही त्यांनी केली. राजवाडा पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक दतात्रय नाळे यांच्या हस्ते ही मदत पाटील कुटुंबीयांना देण्यात आली.
यावेळी नाळे म्हणाले की, यातून एकच गोष्ट सिद्ध होते की राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीतील बिडी कॉलनीतील मुस्लिम समाजाने कोणताही धार्मिक मतभेद न ठेवता गरजू कुटुंबास मदत करून सामाजिक व धार्मिक एकोपा जपण्याचे मोठे काम केले आहे. तसेच राजर्षी शाहू महाराजांचे विचार हे खऱया अर्थाने बिडी कॉलनीतील मुस्लिम समाज व जमाअतने आज तागायत जीवंत ठेवण्याचे काम केले आहे. आज प्रत्येक समाजाने धार्मिक मतभेद न ठेवता सामाजिक एकोपा दाखवण्याची खऱया अर्थाने गरज आहे. सुन्नत जमाअत कमिटीने समाजात एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचे कौतुकास्पद कार्य सुरू आसल्याचे सांगितले. यामध्ये जमाअतचे अध्यक्ष गुलाब पठाण, सदस्य समीर गवंडी, शकील जत्राटे, फारूक मनेर, इजाज नागरकट्टी, सलीम शेख, जावेद हवालदार, फैय्याज कवठेकर तसेच कमिटीतील सर्व सदस्य प्रत्येक सामाजिक उपक्रमासाठी राबतात.
सुन्नत जमात कमिटीचे 16 वर्षापासून समाजकार्याचा वसा
‘तुम जमीन वालोंकी मदत करो, उपरवाला तुम्हारी मदत करेगा’ हे ब्रिद वाक्य घेऊन समाजातील प्रत्येक घटकातील कोणताही भेदभाव न मानता गरजू लोकांची मदत करणे हे आपले आदय़ कर्तव्य आहे, हा एकच उद्शे डोळयासमोर ठेऊन मदिना मस्जित सुन्नत जमात कमिटीचे समजकार्य सुरू आहे. 16 वर्षापासून कमिटी मार्फत गरजू कुटुंबांना महिन्याचे गृहउपोयगी वस्तू, औषधोपचरासाठी पैशाची मदत, प्रत्येक रमजान महिन्यात धान्य वाटप केले आहे. कोरोना असो वा महापूराचे संकट असो यावेळी कमिटीचे सदस्य गरजूंच्या मदतीला धावून आले आहे.