Tarun Bharat

कोल्हापूरचा सर्वांगिण विकास हाच प्रमुख अजेंडा खा.धनंजय महाडिक यांची माहिती

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

राज्यसभा निवडणुकीमध्ये मला उमेदवारी मिळेल हे माझ्या स्वप्नातही नव्हते. राज्यासह देशातील अनेक दिग्गज नेते व उद्योजक उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीमध्ये होते. तरीही महाडिक गटाच्या ताकदीवर विश्वास ठेवून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मला उमेदवारी देऊन निवडून आणले. त्यामुळे 10 जून हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाचा दिवस आहे. यापुढे खासदार म्हणून जिह्यातील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्याचा प्रथम अजेंडा असेल. त्यानंतर पक्षीय संघटनात्मक बांधणीला प्राधान्य दिले जाणार असून आगामी सर्व निवडणुकांमध्ये शतः प्रतिशत भाजप हेच ध्येय असेल, अशी माहिती राज्यसभेचे नूतन खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

राज्यसभा निवडणुकीच्या काटाजोड लढतीमध्ये यशस्वी झालेले खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी दैनिक तरुण भारत कार्यालयास भेट दिली. यावेळी तरुण भारतचे संस्थापक (स्व.) बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी संपादक मनोज साळुंखे, जाहिरात व्यवस्थापक (ग्रामीण) आनंद साजणे, मुख्य प्रतिनिधी संजीव खाडे, प्रशासन अधिकारी राहूल शिंदे, जाहिरात मांडणी विभाग प्रमुख विजय शिंदे, विशेष प्रतिनिधी सुधाकर काशिद, कृष्णात चौगले यांच्याशी दिलखुलास संवाद साधून आगामी काळातील विकासकामे व संघटनात्मक बांधणीचे धोरण आणि भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनिती याबाबत भूमिका स्पष्ट केली.

खासदार महाडिक म्हणाले, खासदारकीबरोबरच भाजप पक्षाकडून मला संघटनात्मक बांधणीच्या जबाबदारीही दिली जाणार असून ती प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. जिह्यात माझ्या खासदारकीच्या काळात मंजूर झालेली विकासकामे गेल्या अडीच वर्षात ठप्प झाली आहेत, ती कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील. यावेळी माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम, विजय सुर्यवंशी, अशिष ढवळे, राजसिंह शेळके, वैभव माने, अशोक देसाई आदी उपस्थित होते.

बास्केट ब्रीज होणारच
माझ्या तत्कालिन खासदारकीच्या काळात बास्केट ब्रीज मंजूर केला होता. त्याच्या मंजूरीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण या विकासकामाचे श्रेय मला मिळू नये, यासाठी काहींनी हा प्रोजेक्ट थांबवला आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून एक जबाबदार पदावर असणाऱया व्यक्तीने या प्रोजेक्टबाबत काही तरी बोलणे चुकीचे आहे. पावसाळ्याच्या कालावधीत 40 टक्के कोल्हापूर महापूराच्या पाण्याखाली जाते. हे होऊ नये यासाठी बास्केट ब्रीजची नितांत गरज आहे. प्रत्येक पावसाळ्यात महापुराचे पाणी घरात येत असेल तर आयटी पार्क आणि विमानतळ हा नंतरचा प्रश्न आहे. बास्केट ब्रीजमुळे शहरातील महापूराची तीव्रता कमी होईल. आता मी सत्ताधारी पक्षाचा खासदार असून जिह्यातील सर्व कामे होणारच, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.

बंद रेल्वे फेऱ्या, विमान फ्लाईटस् सुरु करणार

कोल्हापूर जिह्यातील नागरीकांची दळणवळणाची सोय व्हावी, या हेतून मी रेल्वे फेऱया वाढवल्या होत्या. विमानाच्या फ्लाईटस्ची संख्याही वाढवली होती. पण गेल्या काही वर्षात मी सुरु केलेल्या अनेक रेल्वे फेऱया आणि विमानाच्या फ्लाईटस् रद्द झाल्या आहेत. त्या सेवा पुन्हा सुरु करणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.

शतः प्रतिशत भाजप हाच अजेंडा
जिल्हा परिषद, महानगरपालिकासह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शतःप्रतिशत भाजप हाच अजेंडा राहिल. जनसुराज्यसह अन्य लहान पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याची तयारी सुरु आहे. याशिवाय महाविकास आघाडीच्या त्रासाला कंटाळून काही घटक पक्ष आमच्यासोबत यायला तयार असतील, तर त्यांनाही सोबत घेऊ असे, खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले.

मला भरपूर मिळाले, मंत्री पदाची अपेक्षा नाही

राज्यसभेतील खासदार म्हणून मला भरपूर काही मिळाले आहे. ही निवडणूक टेक्निकल झाली असून भाजपच्या प्रमुख नेत्यांनी माझ्या विजयासाठी मोठे योगदान दिले आहे. ही निवडणूक माझ्या कल्पनाशक्तीच्या पलिकडची होती. पण ते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शक्य झाले. विजयी होण्याचा अंदाज असल्यामुळे भाजपच्यावतीने मला उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मी समाधानी असून यापुढे ताकदीने काम करणार आहे. मला मंत्री पदाची अपेक्षा नसल्याचे महाडिक यांनी सांगितले.

ताराराणी आघाडीचे विसर्जन नाही
महापालिका निवडणूकीत 92 जागांवर भाजपचे उमेदवार देण्यास प्राधान्य असणार आहे. मात्र, काही उमेदवारांना भाजपमधून निवडणूक लढविण्यास अडचण असल्यास त्यांना ताराराणी आघाडीतून रिंगणात उतरवले जाईल, असे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले.

Related Stories

कोल्हापूर : 22 हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांचा पोबारा

Archana Banage

राष्ट्रवादीची उर्वरीत मते शिवसेनेच्या उमेदवाराला

Archana Banage

स्टार्टअप व इन्वेस्टर समिटमध्ये व्यापार व उद्योग घटकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी

Archana Banage

घराच्या खापऱ्या काढत केला चुलतीवर बलात्कार, पुतण्याला ‘हे’ कृत्य पडलं महागात

Rahul Gadkar

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषण प्रकरणी शिरोळ येथे शेतकरी संघटनेचे नदी पात्रात उतरून आंदोलन

Archana Banage

विट्यात कोरोना उपचारासाठी खाजगी हॉस्पिटल ताब्यात घ्या

Archana Banage
error: Content is protected !!