महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन पाटणकर यांचा विविध पुरस्कारांनी गौरव; पाटणकर यांचे कळे उपविभागात उत्कृष्ट कामकाज
कोल्हापूर प्रतिनिधी
महावितरणच्या कळे उपविभागात उपकार्यकारी अभियंता म्हणून काम करत असताना उत्कृष्ठ कार्यालयीन कामकाजाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे अधिकारी म्हणून सचिन पाटणकर यांची ओळख आहे. त्यांच्या कामाची अनेक संस्था, संघटनांनी दखल घेऊन उत्कृष्ट उपकार्यकारी अभियंता म्हणून त्यांचा गौरव केला आहे. तर कोल्हापूर येथील क्रांतीसुर्य फौंडेशनने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ‘समाजाभिमुख उल्लेखनीय कार्यगौरव’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
पाटणकर हे 2017 पासून महावितरणच्या कळे उपविभागीय कार्यालयामध्ये उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. या उपविभागांतर्गत 4 शाखा कार्यालय व 4 उपकेंद्रे आहेत. 91 ग्रामपंचायती आणि दुर्गम धनगरवाडय़ांचा सुमारे 50 किलोमीटर भौगोलिक क्षेत्र असलेले त्यांचे कार्यक्षेत्र आहे. विशेष बाब म्हणजे कळे उपविभागांतर्गत समाविष्ट गावांतून 4 नद्या जातात. त्यामुळे 2019, व 2021 मधील महापूराच्या कालावधीत शेकडो विद्युत खांब,वीज वाहक तारा जमीनदोस्त झाल्या होत्या. ही विस्कळीत झालेली वीज यंत्रणा पाटणकर यांनी वीज कर्मचारी आणि ठेकेदार कंपन्यांच्या माध्यमातून तत्काळ पुर्ववत केली. गेल्या चार वर्षात घरगुती, व्यापारी, शेतीपंप, औद्योगिक अशी एकूण 3 हजारांपेक्षा जास्त नवीन वीज जोडण्या दिल्या आहेत. तर 224 नवीन रोहित्रे उभारली आहे. सध्या वीज ही अत्यावश्यक सुविधा झाल्यामुळे ‘मागेल त्याला वीज’ देण्यासाठी पाटणकर यांचा नेहमी प्रयत्न असतो.”
सामाजिक भान असणारा अधिकारी
सचिन पाटणकर हे महावितरणमध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. दुर्गम धनगरवाडय़ांमधील गोरगरीब लोकांना वेळोवेळी वस्तू आणि अर्थिक स्वरूपात मदत केली आहे. अनेक गरीब विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल सुकर व्हावी यासाठी त्यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे.