शिरोळ प्रतिनिधी
उन्हाळ्यामध्ये शरीराला गारवा देणारे फळ म्हणजे कलिंगड. सध्या कलिंगड या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी असताना देखील काही व्यापाऱ्यांनी कलिंगडचा दर पाडून मागणी करीत असल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
शिरोळ येथील सतीश माने या तरुण शेतकऱ्याने एक एकर दहा गुंठे जमिनीमध्ये कलिंगड पिकाची लागवड केली होती. याकरिता त्यांना ठिबकसह एक लाख 90 हजार रुपये खर्च आला आहे. कष्टाने पिकवलेल्या फळ पिकाला चांगला दर असताना व्यापाऱ्यांनी मात्र दर पाडला आहे. सध्या कलिंगडला 60 ते 70 रुपये प्रति नग दर असताना त्याची मागणी मात्र पंधरा ते वीस रुपयाला मागणी व्यापारी करत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त होती. स्वतः सतीश माने कोल्हापूर-सांगली रोडवरील कृष्णा नदीजवळ असलेल्या टोलनाक्याजवळ एका फळास पन्नास रुपये प्रमाणे विक्री करीत आहेत.
याबाबत सतीश माने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला दर पाडून मागणी करीत आहेत. व्यापारी दर पाडून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. शासनाने याबाबत लक्ष घालावे अशी मागणी करून शेतकऱ्यांनी आपला माल थेट ग्राहकापर्यंत पोहचवावा असे मत त्यांनी व्यक्त केले.