घुणकी / प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील किणी गावाच्या ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी हे थकीत घरफाळा वसुली साठी टोल नाक्यावर गेले असता त्यांना टोल व्यवस्यापनाकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने संतप्त ग्रामस्थानी टोल इमारतीस टाळे ठोकल्य़ाची घटना घडली.
पुणे -बेंगलोर महामार्गावर हातकणंगले तालुक्यात असलेल्या किणी या गावच्या हद्दीत टोलनाका आहे. या टोलनाक्याच्या इमारतीचे घरफाळा बऱ्याच वर्षापासून थकित आहे. वारंवार सुचना देउनही कंपनीकडून यांची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे टोलनाक्यावर वसुलीला गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना टोल व्यवस्यापनाच्या कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरुन हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी व सदस्यांनी ग्रामस्थाना बोलावून घेतले. संतप्त ग्रामस्थासमोर झालेल्या प्रकारा बाबत टोल कर्मचाऱ्याने माफी मागून पडदा टाकणेचा प्रयत्न केला. मात्र संतप्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनाने टोल नाका इमारतीस टाळे ठोकले. या नंतर टोल व्यवस्थापन पोलिसाच्या मदतीने ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र थकीत घरफाळ्याबाबत जबाबदार अधिकारी थकीत घरफाळ्याबाबत कोणतीच ठोस भूमीका घेत नसल्याचे दिसून येत होते. या घटना स्थळी वडगांव पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त होता.