पिंपळगाव/वार्ताहर
मुसळधार पावसामुळे पाल घाटातील धबधब्यानजीक रस्त्यावर दरडी कोसळल्याने गारगोटी -गडहिंग्लज मार्गावरील वाहतूक जवळपास तीन तास बंद झाली होती. मोठ्या प्रमाणात माती व खडक रस्त्यावर आल्याने रस्ता बंद झाला होता. जोरदार पाऊस सुरू असल्याने रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी घाटामध्ये वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
रात्रीच्या वेळी हा प्रकार घडल्याने घाटामध्ये याठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती समजताच पोलिस व सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्यने रस्तावरील माती व मुरूम बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरू होण्यास मदत झाली.