कोल्हापूर प्रतिनिधी
बारा राज्यातील 190 लोककलावंतांकडून लोककलेच्या सादरीकरणातून लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना शनिवार 14 मे रोजी आदरांजली वाहण्यात येणार आहे. शाहू मिल येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत भारत सरकारच्या केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या दक्षिण मध्य क्षेत्र केंद्र नागपूर व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 14 व 15 मे दोन दिवस सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी रसिकांना मिळणार आहे.
लोककलावंतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. नागपूर दक्षिण मध्य क्षेत्र केंद्राचे संचालक दीपक खीरवाडकर, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. देशभरातील 12 राज्यातील 190 लोककलावंत आपल्या कलेतून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहणार आहेत. प्रत्येक राज्यातील नृत्ये होणार असून प्रत्येक संघामध्ये 15 कलाकार सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे काही स्थानिक कलाकारही यावेळी आपले नृत्याविष्कार सादर करणार आहेत. विविध राज्यातील कलावंतांचा कलाविष्कार पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
असे होणार सांस्कृतिक कार्यक्रम
महाराष्ट्र : पोवाडा, धनगरी गजा, सोंगी मुखवटे व लावणी मध्य प्रदेश गुदुम बाजा. छत्तीसगड : पंथी नृत्य. पंजाब : भांगडा नृत्य . काश्मीर : रोफ नृत्य. गुजरात : सिद्धी धमाल. आसाम : बिहू नृत्य. हरियाणा : घुमर. कर्नाटक : हालकी सुग्गी कुनिथा.