तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठात झालेल्या बैठकीत निर्णय
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठातील विविध अधिकार मंडळाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तर 14 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असल्याने विद्यापीठ विकास आघाडीची मंगळवारी तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठात बैठक झाली. या बैठकीत पुर्वीच्या विद्यापीठ विकास आघाडीतील सर्व संघटनांनी एकत्रितपणे अगामी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तसेच पाच वर्षे सर्व अधिकार मंडळामध्ये केलेल्या कामाचा आढावा घेतला. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती व विद्यापीठ विकास आघाडीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील अध्यक्षस्थानी होते.
गेल्या पाच वर्षापुर्वी शिवाजी विद्यापीठातील विविध अधिकार मंडळासाठी झालेल्या निवडणुकीत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हय़ातील प्राचार्य, संस्थाचालक, शिक्षक, पदवीधर यांनी एकत्रित येवून निवडणूक लढवली होती. राज्यातील एकूण राजकीय घडामोडी पाहता अगामी निवडणूकीत विद्यापीठ विकास आघाडीतून बाहेर पडत विद्यापीठ विकास मंच स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते. परंतू पहिल्याच बैठकीत पुर्वीची विद्यापीठ विकास आघाडी आहे तशी ठेवून सक्षम उमेदवार देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे अगामी निवडणूकीतही शिवाजी विद्यापीठावर विद्यापीठ विकास आघाडीचे वर्चस्व राहणार हे निश्चित. विद्यापीठातील दहा प्राचार्य, सहा व्यवस्थापन प्रतिनिधी, दहा महाविद्यालयीन प्राध्यापक, तीन विद्यापीठ प्राध्यापक आणि दहा नोंदणीकृत पदवीधर अधिसभा सदस्य, विद्यापीठ व महाविद्यालयीन प्राध्यापकांमधून आठ प्राध्यापक विद्यापरिषदेवर, 40 सदस्य अभ्यासमंडळावर तीन महाविद्यालयीन विभागप्रमुख या पदांसाठी निवडणूक होणार आहे. पुढच्या आठ दिवसात दुसरी बैठक होईल, या बैठकीत कोणाला किती जागा द्यायच्या याचा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळवारी तळसंदेत झालेल्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. यावेळी विद्यापीठ विकास आघाडीचे उपाध्यक्ष डॉ. क्रांतीकुमार पाटील, आमदार जयंत आसगावकर, प्रताप उर्फ भैय्या माने, विवेकानंदच्या सेक्रेटरी शुभांगी गावडे, कोअर कमिटीचे डी. यु. पवार, डॉ. भालभा विभुते, प्राचार्य डॉ. सतीश घाळी, डॉ. डी. जी. कणसे, डॉ. डी. आर. मोरे, व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य अमित कुलकर्णी, ऍड. धैर्यशील पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, सातारच्या चित्रलेखा कदम, संस्थापक, प्राचार्य, शिक्षक, पदवीधर उपस्थित होते.
विद्यापीठ विकास आघडी 32 अभ्यास मंडळ व शिक्षक पदांसाठी अग्रही
विद्यापीठ विकास आघाडीकडे गतपंचवार्षिक निवडणूकीत 32 पैकी 26 अभ्यास मंडळ होती. अगामी निवडणूकीत 32 अभ्यास मंडळ व सर्व शिक्षक मंडळावर वर्चस्व ठेवण्यासाठी विकास आघाडी अग्रही आहे. विकास आघाडीकडे सर्व संस्थाचालक, प्राचार्यांचा समावेश आहे. तसेच आघाडीने 24 हजारपेक्षा जास्त पदवीधर नोंदणी केली आहे. त्यामुळे सर्वच पदांवर आघाडीचे वर्चस्व राहणार यात शंका नाही.