अधिसभा विद्यापीठ अभ्यासमंडळात 99.71 टक्के सर्वाधिक मतदान; सरासरी 40 टक्के मतदान; 100उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; बुधवारी परीक्षा भवनमध्ये मतमोजणी; राजकीय नेत्यांसह संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी बजावला मतदानांचा हक्क
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ विविध अधिकार मंडळासाठी सोमवारी कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्हय़ातील 33 मतदान केंद्रावर चुरशीने व मतदान झाले. तीन जिल्हय़ात 4301 मतदार होते त्यापैकी 17374 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्व गटात सरासरी 40 टक्के मतदान झाले असून, एकूण 50 जागांसाठी रिंगणात असलेल्या 100 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. पदवीधरसाठी तीन पटीने नोंदणी झाली असली तरी प्रत्यक्षात 30 टक्के मतदान झाले. बुधवार 16 नोव्हेंबर रोजी परीक्षा भवन येथे मतमोजणी होणार आहे. विविध अधिकार मंडळावर विद्यापीठ विकास आघाडी आणि शिव-शाहू आघाडीत रस्सीखेच होणार आहे.
शहरातील सायबर कॉलेज, शहाजी कॉलेज, कॉमर्स कॉलेज या तीन मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. प्रत्येक मतदान केंद्रावर विद्यापीठ प्रशासनाची यंत्रणा मतदान प्रक्रियेत सक्रीय होती. सायबर मतदान केंद्रावर माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला. आमदार ऋतुराज पाटील, डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, सुटाचे प्रमुख कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील यांनी सायबर कॉलेज, कॉमर्स कॉलेज, शहाजी कॉलेज या मतदान केंद्रांना सदिच्छा भेट देत उमेदवार आणि मतदारांशी चर्चा केली. यंदा पदवीधरमध्ये मतदार संख्या जास्त असली तरी प्रत्यक्ष मतदान मात्र कमी झाल्याचे चित्र आहे. दुपारपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होती. तर दुपारी चार नंतर सर्वच मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती. काहींनी अखेरच्या टप्प्यात मतदान केले. मतदान केंद्रावर नोंदणीकृत पदवीधर, विद्या परिषद, शिक्षक, अभ्यासमंडळ गटातील उमेदवार अन संघटनेचे नेते दिवसभर फिरत होते.
बुधवारी मतमोजणी
शिवाजी विद्यापीठातील परीक्षा भवनमध्ये बुधवारी सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने मतमोजणीची जय्यत तयारी केली आहे.
आघाडीच्या नेत्यांनी मांडला मतदान केंद्रांवर ठिय्या
मतदार नोंदणीपासून ते मतदान केंद्रावर मतदाराला आणण्यापर्यंतची जबाबदारी त्या त्या संघटनेची होती. त्यामुळे विद्यापीठ विकास आघाडी व विद्यापीठ विकास मंच, सुटा व शिव-शाहू आघाडीच्या नेत्यांनी मतदान केंद्रांवर ठिय्या मांडला होता.
कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्हय़ातील गटनिहाय मतदान
मतदार संघ एकूण मतदान झालेले मतदान टक्केवारी
अधिसभा शिक्षक : 2945 2749 93.34
अधिसभा विद्यापीठ शिक्षक : 166 160 96.39
अधिसभा नोंदणीकृत पदवीधर : 36343 11131 30.39
विद्यापरिषद शिक्षक : 3111 2908 93.47
अभ्यास मंडळे : 436 426 97.71
सायबर कॉलेज गटनिहाय मतदान
अधिसभा शिक्षक ः 263 पैकी 223
अधिसभा विद्यापीठ शिक्षक ः 166 पैकी 160
अधिसभा नोंदणीकृत पदवीधर ः 11693 पैकी 3726
विद्यापरिषद शिक्षक ः 429 पैकी 383
अभ्यास मंडळे ः 26 पैकी 25
शहाजी कॉलेज गटनिहाय मतदान
अधिसभा शिक्षक ः 211 पैकी 203
अधिसभा नोंदणीकृत पदवीधर ः 4102 पैकी 1203
विद्यापरिषद शिक्षक ः 211 पैकी 203
अभ्यास मंडळे ः 23 पैकी 22
कॉमर्स कॉलेज गटनिहाय मतदान
अधिसभा शिक्षक ः 93 पैकी 83
अधिसभा नोंदणीकृत पदवीधर ः 1865 पैकी 566
विद्यापरिषद शिक्षक ः 93 पैकी 83
अभ्यास मंडळे ः 17 पैकी 16