वारणानगर / प्रतिनिधी
येथील महाविद्यालयीन तरुणाने रहात असलेल्या खोलीमध्ये आत्महत्या केली. शुभम कृष्णाथ बजागे (वय १९, रा. पडवळवाडी ता. करवीर ) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे.
या बाबत पोलिसांच्याकडून व घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, शुभम ला गेल्या वर्षी कॅम्प्युटर इंजिनियर या शाखेत प्रवेश मिळाला होता. त्याचे वडील शेतकरी कुटुंबातील असून जिद्दीने आपला मुलगा इंजिनियर करण्याचे ठरविले होते. तसा तो सुरवातीपासून हुशार होता. त्याला गुणवत्तेनुसार इंजिनियरला प्रवेश मिळाला होता. शुभम याचा स्वभाव शांत व मनमिळाऊ होता. सोमवारी तो नेहमीप्रमाणे वर्गात गेला होता. दुपारनंतर मात्र तो खोलीवर राहीला. रूममधील त्याचे मित्र आल्यावर रूमचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्यावेळी मित्रांनी त्याला हाक दिली. मोबाईलवरती संपर्क साधला पण आतून त्याचा काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर विद्यार्थ्यानी प्रयत्न करून आतील दरवाज्याची कडी काढली. शुभमची मनस्थिती व्यवस्थीत नव्हती, त्यामुळे त्याच्यावरती काही दिवसापासून औषधोपचार सुरू असल्याचे वडील कृष्णात बजागे यांनी पोलीसांना सांगितले. त्याच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे. कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करणेत आले. पुढील तपास कोडोली पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार डोईजड करीत आहे.