जिल्हा लेखा व्यवस्थापक लोहार यांचा राजीनामा मंजूर : कोरोना साहित्य खरेदी प्रकरणावरून लोहार ठरले होते वादग्रस्त
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हा परिषदअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानचे जिल्हा लेखा व्यवस्थापक नितीन ज्ञानदेव लोहार यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सहसंचालक (अतांत्रिक) संजय सरवदे यांनी सेवामुक्त केले. कोरोना साहित्य खरेदी प्रकरणावरून लोहार वादग्रस्त ठरले होते. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला असल्याची जिल्हा परिषदेत चर्चा होती. अखेर त्यांचा राजीनामा मंजूर करून सहसंचालकांनी त्यांना सेवामुक्त केले.
लोहार हे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा लेखा व्यवस्थापक म्हणून 7 ऑगस्ट 2014 पासून कार्यरत होते. त्यांनी मार्च महिन्यामध्ये आपला राजीनामा अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्याकडे सादर केला होता. सदर अर्ज मंजूरीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाकडे पाठवण्यात आला होता.
वास्तविक मार्च महिन्यामध्ये अर्थिक विषयक बाबींचा निपटारा करणे आवश्यक असताना याच कालावधीत लोहार गैरहजर होते. सदर वर्तन पदाला अनुसरून नसल्याचा ठपका सहसंचालकांनी लोहार यांच्यावर ठेवला आहे. तसेच लोकप्रतिनिधींनी दबाव आणल्याबद्दल लोहार यांनी दिलेले म्हणणे समाधानकारक नसल्याचे सहसंचालकांच्या पत्रात नमूद आहे. एकंदरीत लोहार यांचे कामकाज असमाधानकारक असल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयाकडे पाठवलेला लोहार यांचा राजीनामा मंजूर केला असून त्यांना सेवामुक्त केले आहे.