Tarun Bharat

KOLHAPUR; खासदार मंडलिक आज शिंदे गटात? लवकरच घोषणा


-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मळली पायवाट
-खासदार धैर्यशील माने नॉट रिचेबल
-दोन्ही खासदारांची भूमिका लवकरच होणार स्पष्ट
-जिह्याच्या राजकारणात होणार मोठे फेरबदल

कोल्हापूर/कृष्णात चौगुले
‘शिवसेनेतून जे शिंदे गटासोबत गेले ते बेंटेक्स आणि राहिले ते चोख सोनं’ असे म्हणणारे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांची आता शिंदेशाहीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. वीरेंद्र मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी हमीदवाडा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या दिशेने पायवाट मळली आहे. कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी आणि विकासाच्या राजकारणासाठी शिंदे गटासोबत जावे असा कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्यामुळे खासदार मंडलिक लवकरच पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याची शक्यता आहे. दरम्यान, खासदार धैर्यशील माने रविवारी दिवसभर नॉटरिचेबल असल्यामुळे ते कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिह्यातील दोन्ही खासदार शिंदे गटात सहभागी होणार असल्याचा गौप्यस्फोट शनिवारी केला. त्यानंतर खासदार मंडलिक व खासदार माने यांच्याशी संपर्क साधला असता ते नॉटरिचेबल होते. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा सूर आजमावण्यासाठी मंडलिक यांनी तत्काळ कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. खासदार मंडलिक दिल्लीत असले तरी त्यांच्या अनुपस्थितीत वीरेंद्र मंडलिक यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात बहुतांशी सर्व कार्यकर्त्यांनी शिंदे गटासोबत जावे असा आग्रह धरला आहे. या मेळाव्यात कोणतीही घोषणा झाली नसली तरी अप्रत्यक्षरित्या शिंदेशाहीसोबत जाण्याचे संकेत मिळाले आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार मंडलिक व खासदार माने यांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात प्रथमच लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकला. त्यामुळे शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपूर्ती झाली असली तरी अवघ्या अडीच वर्षानंतर त्यांचे स्वप्न भंगणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकरसह हाती शिवबंधन बांधलेले माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सेनेला रामराम ठोकला. त्यानंतर जिह्यातील शिवसेनेचे माजी आमदार कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असताना खासदार मंडलिक यांनी शिवसेना पदाधिकाऱयांचा मेळावा घेतला. यामध्ये त्यांनी आपण शिवसेनेसोबतच आहोत हे निक्षून सांगत असतानाच जे शिवसेनेतून गेले ते बेंटेक्स असल्याचा आरोप केला. पण आता खासदार मंडलिक हेच शिंदेशाहीच्या वाटेवर असल्यामुळे आता चोख सोनं कोणतं, त्याची व्याख्या काय आहे, असे उपरोधिक प्रश्न शिवसैनिकातून उपस्थित केले जात आहेत.

        माजी आमदारांचे ‘थांबा आणि पहा’

जिह्यातील शिवसेनेला बंडखोरीचे ग्रहण लागल्यानंतर आता करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके, हातकणंगलेचे डॉ. सुजित मिणचेकर, शिरोळचे उल्हास पाटील आणि शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील कोणती भूमिका घेतात याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. क्षीरसागर, आबिटकर, यड्रावकर यांच्यानंतर आता जिह्यातील दोन्ही खासदार बंडाच्या पवित्र्यात असले तरी माजी आमदारांनी अद्याप ‘थांबा आणि पहा’ अशी भूमिका घेतली आहे.

जिह्याच्या राजकारणात होणार मोठे फेरबदल

2019 च्या लोकसभा निवडणुकीपासून जिह्यात ‘आमचं ठरलंय’ या टॅगलाईनखाली राजकारण सुरु आहे. खासदार मंडलिक आणि माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील या दोघांचे पक्ष वेगळे असले तरी यावेळी बहुपक्षीय ताकदीमुळे सुमारे अडीच लाखांचे मताधिक्य घेऊन मंडलिक यांनी बाजी मारली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीसह गोकुळच्या निवडणुकीमध्येही तोच कित्ता गिरवला गेला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सोय पाहून तडजोड करण्यात आली. आता खासदार मंडलिक आणि माने शिंदे गटासोबत गेल्यास जिह्याच्या राजकारणात मोठे फेरबदल होणार असून आगामी काळातील जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये त्याचे पडसाद उमटणार आहेत.

खासदार माने नॉटरिचेबल

खासदार मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातील कौल पाहता खासदार माने कोणती भूमिका घेणार, याबाबत जिह्यात चर्चा सुरु आहे. तरुण भारतच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. पण खासदार मानेंची वाटचाल ही मंडलिक यांच्यासोबतच असेल असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Related Stories

पुढील 4 तासात मुंबई, कोकणात जोरदार पावसाचा इशारा

Tousif Mujawar

कडक लॉकडाऊनची आज घोषणा?; मुख्यमंत्री आज साधणार जनतेशी संवाद

Archana Banage

शासनाने सरसकट शब्दाचा अर्थ स्पष्ट करावा; सांगरुळातील संतप्त शेतकर्‍यांचा सवाल

Archana Banage

लॉकडाऊनसंदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेणार – मंत्री मुश्रीफ

Archana Banage

इंदू मिलवरुन राजकारण करु नये : उध्दव ठाकरे

Tousif Mujawar

कोल्हापूर : कुपलेवाडी रस्ता बनला मृत्यूचा सापळा

Archana Banage
error: Content is protected !!