एकेरीत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक
कोल्हापूर प्रतिनिधी
हरियाणातील झज्जर येथे झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय मालिका मुलींच्या 18 वर्षांखालील टेनिस स्पर्धेत कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय स्टार टेनिसपटू ऐश्वर्या जाधवने दुहेरीत विजेतेपद संपादन केले तर एकेरीत उपांत्यपूर्व फेरी धडक मारली.
दुहेरीत ऐश्वर्या जाधवने दिल्लीच्या ईशी माहेश्वरीच्या साथीने सोहिनी चॅटर्जी (दिल्ली) आणि अन्या जेकब (महाराष्ट्र) यांचा 6-1,6-3 अशा सेटस्मध्ये पराभव केला. उपांत्य फेरीत या जोडीने सुहानी गौर (हरियाणा) आणि तमन्ना पनवार (हरियाणा) यांना 6-2,6-1 अशा सरळ सेटस्मध्ये सहज पराभूत करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत ऐश्वर्या आणि ईशा या जोडीने चुरशीच्या लढतीत आकृती सोनकुसरे (महाराष्ट्र) आणि भूमिका रोहिल्ला (हरियाणा) या जोडीचा 4-6, 6-3, 10-5 अशा सेटस्मध्ये पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला.
एकेरीत ऐश्वर्या जाधवने पहिल्या फेरीत दिल्लीच्या सिल्वीचा 6-3, 6-0 अशा सेटस्मध्ये पराभव केला. त्यानंतर हरियाणाच्या व्ही. व्ही. सुहानीला ऐश्वर्याने 6-3, 6-3 उपांत्यपूर्व फेरी गाठली. या फेरीत मात्र ऐश्वर्याला हरियाणाच्या सौमित्र वर्मा हिच्याकडून 6-1, 3-6, 3-6 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवाने ऐश्वर्याचे एकेरीतील विजयाचे स्वप्न भंगले. मात्र दुहेरीतील विजेतपदाने तिने या स्पर्धेतील आपला दबदबा कायम राखला.