Tarun Bharat

KOLHAPUR; विठ्ठला ! कोणता झेंडा घेऊ हाती? नेत्यांच्या सोयीस्कर भूमिकेमुळे शिवसैनिक द्विधामनस्थितीत

  • जिल्हय़ातील शिवसैनिकांमध्ये द्विधा मनस्थिती
  • शिवसेनेत राहायचे की शिंदे गटासोबत जायचे हा प्रश्न
  • खासदार मंडलिक, माने सोबत आल्यास शिंदे गटाला बळकटी

कोल्हापूर/धीरज बरगे

मातोश्री शिवसैनिकांचे मंदिर अन् या मंदिरातील देव त्यांच्यासाठी विठ्ठलच… मात्र शिवसेना आमदारांच्या बंडानंतर पक्षाला लागलेली गळती थांबेनाशी झाली आहे. कोल्हापूर जिल्हय़ात खासदार मंडलिक आणि खासदार मानेही जवळपास शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे चित्र आहे. त्यांनी शिंदे गटासोबत जाण्याची उघड भूमिका घेतल्यास जिल्हय़ातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. एकापोठापाठ एक लोकप्रनितिधी शिंदे गटात दाखल होत असल्याने शिवसैनिकांमध्येही द्विधामनस्थिती निर्माण झाली आहे. मनामध्ये विठ्ठलाबद्दल आदर असला तरी राजकीय भविष्याचा अंदाज बांधत शिवसेनेतील बहुतांश पदाधिकारी, शिवसैनिक शिवसेनेत रहायचे की शिंदेगटात जायचे अशा द्विधामनस्थितीत सापडले आहेत. त्यामुळे विठ्ठला कोणता झेंडा घेवू हाती, असे म्हणण्याची वेळ शिवसैनिकांवर आली आहे.

दोन दिवसापूर्वी शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या मेळाव्यानंतर जिल्हय़ातील शिवसेना आणि शिंदे गटातील वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडत असताना जिल्हय़ातील दोन्ही खासदार शिंदे गटासोबत असल्याचा बाँम्बच क्षीरसागर यांनी टाकला. यानंतर खासदार मंडलिक, माने यांनी अद्यापही त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे दोन्ही खासदार शिंदे गटासोबत गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. क्षीरसागर यांनी पुढील काळात अनेक पदाधिकारीही आमच्यासोबत येतील असेही वक्तव्य केले आहे. त्यामुळे हे पदाधिकारी कोण हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.

एकवटलेली शिवसेना पुन्हा विस्कळीत

शहरातील शिवसेना राजेश क्षीरसगार आणि संजय पवार अशा दोन गटात विभागली होती. तर ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी आपल्या मतदार संघापुरतेचे मर्यादित होते. याचा फटका शिवसेनेला वेळोवेळी बसला. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणूकीत खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना एकत्र आली. उत्तरच्या पोटनिवडणुकीत शहरासह ग्रामीण शिवसेना एकवटली. आजी-माजी आमदार, पदाधिकारी यांनी मतभेद बाजूला ठेवून शिवसेनेला गतवैभव प्राप्त करुन देण्याचा निर्धार केला. जिल्हय़ात शिवसेनेला अच्छे दिन येतील असे चित्रही होते. पण तोच शिवसेनेत झालेल्या बंडाने एकवटलेली शिवसेना पुन्हा विस्कळीत झाली आहे.

शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीला शोधावा लागणार उमेदवार

शिवसेनेचे विद्यमान दोन्ही खासदार शिंदे गटात आल्यास ते 2024®³ee लोकसभा निवडणुकीत भाजप-शिंदेगटाचे उमेदवार असू शकतात. तर राष्ट्रवादीकडून 2019 ची लोकसभा निवडणूक लढलेले धनंजय महाडिक सध्या भाजपच्या कोटय़ातून राज्यसभेचे खासदार आहेत. हातकणंगले मतदार संघातून लोकसभा निवडणुक लढलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सवता सुभा मांडला आहे. जिल्हय़ातील दोन्ही लोकसभा मतदार संघात सध्यातरी शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिंदेगटाला टक्कर देण्यासाठी तीनही पक्षांना उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे.

विधानसभेची वाटचालही खडतरच

शिवसेनेची विधानसभेचीही वाटचाल खडतर आहे. आमदार प्रकाश आबिटकर, सहयोगी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर या विद्यमान आमदारांसह राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर सध्या शिंदेगटासोबत आहेत. तर करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी त्यांची भुमिका स्पष्ट केली नसली तरी आमदारांच्या बंडानंतर ते शिवसेनेत ऍक्टीव्ह नाहीत. त्यांचाही कल शिंदे गटाकडेच असल्याची चर्चा आहे. तर उर्वरीत तीन माजी आमदारांच्या मतदारासंघामधील परिस्थिती पाहता ते विजयापर्यंत पोहचतील की नाही हे सांगणे कठीण आहे. तीन माजी आमदारांचे मतदारसंघ वगळता अन्य सात विधानसभा मतदार संघात उमेदवार शोधण्यापासून शिवसेनेला सुरवात करावी लागणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीची वाढणार डोकेदुखी

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणुकांना सामोरे जात जिल्हय़ातील प्रमुख सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळवले. जिल्हा परिषद, महापालिका, गोकुळ येथील सत्ता काबिज करताना काँग्रेस, राष्ट्रवादीला शिवसेनेची साथ मोलाची ठरली. मात्र आता शिवसेनेची ताकद शिंदे गटातून भाजपसोबत जाणार आहे. त्यामुळे अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीसमोर भाजप, शिंदे गटाचे तगडे आव्हान असणार आहे. शिंदेगट पुढील काळात काँग्रेस, राष्ट्रवादीची डोकेदुखी ठरणार आहे.

Related Stories

कोरोना लसींच्या किंमतीबाबत सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

Archana Banage

मळणी मशीनमध्ये सापडून महिला जागीच ठार,पन्हाळ्यातील मोहरेतील घटना

Archana Banage

काही जोकरांमुळे कोरोना पसरतोय : सलमान खान भडकला

prashant_c

‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा देणार : अजित पवार

Tousif Mujawar

विधिमंडळात ‘मविआ’कडून मोदी सरकारचा निषेध आणि सभात्याग; ही बाब संविधानात न बसणारी- अजित पवार

Abhijeet Khandekar

शेतकरी विधेयकाला संघटीत विरोध करा : डॉ. गणेश देवी यांचे आवाहन

Archana Banage