टीका होताच प्रशासनाला आली जाग
प्रतिनिधी /बेळगाव
हलगा येथील सुवर्ण विधानसौधसमोर शेवया वाळत घातल्या म्हणून कोंडसकोप्प येथील मल्लव्वा या महिलेला कामावरून कमी करण्यात आले होते. खासगी वाहिन्या व समाजमाध्यमांनी सरकारवर टीकेची झोड उठविताच मल्लव्वाला पुन्हा कामावर घेण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने कंत्राटदाराला केली आहे.
दोन दिवसांपूर्वी सुवर्ण विधानसौधसमोर शेवया वाळत घातल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यावेळी सरकारवर टीका झाली. त्यामुळे हा प्रकार कोणामुळे घडला? याची चौकशी करण्यात आली. कंत्राटदाराने दिलेल्या अहवालावरून कोंडसकोप्प येथील मल्लव्वा या महिलेला कामावरून कमी करण्यात आले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बुधवारी सुवर्ण विधानसौध परिसराला भेट देऊन येथील व्यवस्थेची पाहणी केली.
अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याची सूचना अधिकाऱयांना केली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी मल्लव्वाला कामावरून कमी केल्याचे सांगत पत्रक प्रसिद्धीस दिले होते.
या प्रकारावर संपूर्ण राज्यातून टीका झाली. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, पोलीस, जिल्हा प्रशासन आदींवरील जबाबदारी झटकण्यासाठी एका गरीब महिलेवर कारवाई करून प्रशासनाने अन्याय केल्याचे सांगत सोशल मीडियावर टीकेची झोड उठविली. काही खासगी वाहिन्यांनी सरकारवर सडकून टीका करताच मल्लव्वाला पुन्हा कामावर घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी कंत्राटदाराला केली आहे.
इतकेच नव्हे तर मल्लव्वाला शासकीय योजनेतून घर बांधून देण्यासाठीही हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी आपण जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांशी चर्चा केल्याचे जिल्हाधिकाऱयांनी पत्रकारांना सांगितले.