चाकरमान्यांचा परतीचा प्रवास खडतर
प्रतिनिधी/ खेड
दीपावली सुटीचा हंगाम जवळजवळ संपत आल्याने प्रवाशांनी मुंबईकडे परतीची वाट धरली आहे. यामुळे कोकण मार्गावरून धावणाऱया नियमित गाडय़ांसह फेस्टिवल स्पेशल विक्रमी गर्दीने धावत आहेत. यामुळे गाडय़ांमध्ये जागा मिळवताना प्रवाशांची दमछाक होत आहे. गर्दीची ही परिस्थिती आणखी दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता असल्याने रेल्वे प्रशासनाकडून एक्स्प्रेस गाडय़ांना अतिरिक्त डबे जोडले आहेत.
यंदा कोरोना नियंत्रणात आल्याने दीपावली सुटीच्या हंगामात मुंबईहून गावी व गावाहून मुंबईला जाणाऱयांची लक्षणीय संख्या लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने फेस्टिवल स्पेशल गाडय़ा जाहीर केल्या. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर जबलपूर-कोईमतूर साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस, नागपूर-मडगाव विशेष गाडीला मुदतवाढ दिली. मध्यरेल्वेच्या समन्वयाने लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव स्पेशल व लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळूर साप्ताहिक स्पेशल 17 ऑक्टोबरपासून चालवण्यात आल्या. याशिवाय सुरत-करमळी एकेरी साप्ताहिक स्पेशलही चालवण्यात आली.
जामनगर-तिरूनेलवेली, हापा-मडगाव, पोरबंदर-कोच्युवेली एक्स्प्रेस, गांधीधाम-तिरूनेलवेली, भावनगर-कोच्युवेली या एक्स्प्रेस गाडय़ांनाही स्लिपर श्रेणीचा प्रत्येकी एक अतिरिक्त डबा वाढविल्याने गर्दीची तीव्रता कमी झाली. गेल्या दोन दिवसांपासून कोकण मार्गावरून सर्वच गाडय़ा हाऊसफुल्ल धावत आहेत. यामुळे अनेकांना खडतर अन् लोंबकळत प्रवास करावा लागत आहे.
मांडवी एक्स्प्रेस एक तास विलंबाने
कोकण मार्गावर प्रचंड गर्दीसह विलंबाने धावणाऱया गाडय़ांमुळे प्रवाशांना रखडपट्टीला सामोरे जावे लागत आहे. सोमवारी मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी एक्स्प्रेस एक तास विलंबाने धावली. ही एक्स्प्रेस येथून सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली.