प्रतिनिधी/ खेड
कोकण मार्गावर नियमितपणे धावणारी कोकणकन्या एक्स्प्रेस आता एक्स्प्रेसऐवजी सुपरफास्ट धावणार आहे. 20 जानेवारीपासून नवा बदल करण्यात येणार आहे. या नव्या बदलामुळे कोकणकन्या एक्स्प्रेसच्या प्रवासात 2 तास 10 मिनिटांची बचत होणार असून प्रवाशांचा प्रवास आरामदायी होण्यास मदत होणार आहे.
कोकण मार्गावर दररोज धावणाऱया कोकणकन्या एक्स्प्रेसला प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. ही एक्स्प्रेस नेहमीच हाऊसफुल्ल धावत असते. कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने या मार्गावरून धावणाऱया कोकणकन्या एक्स्प्रेससह अन्य चार एक्स्प्रेस मंगळवारपासून विद्युत इंजिनवर धावू लागल्या आहेत. आतापर्यंत कोकणकन्या एक्स्प्रेस 10111/10112 क्रमांकासह धावत होती. नव्या वर्षापासून वेगवान होणारी कोकणकन्या एक्स्प्रेस 20111/20112 क्रमांकासह धावणार आहे.
20 जानेवारीपासून मडगाव-सीएसएमटी मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस मडगाव येथून सायंकाळी 4.50 ऐवजी 7 वाजता सुटणार असली तरी सीएसएमटी स्थानकात आधीच्याच 5 वाजून 40 मिनिटांनी पोहचणार आहे. विजेवर धावणाऱया कोकणकन्या एक्स्प्रेसच्या प्रवासात 2 तास 10 मिनिटांची बचत होणार आहे. सीएसएमटी मुंबई-मडगाव सुपरफास्ट कोकणकन्या एक्स्प्रेस रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी सुटणार आहे.
पनवेलपर्यंत डाऊन गाडीच्या वेळापत्रकात बदल झाला असला तरी गाडीचा वेग वाढणार असल्याने खेड स्थानकात आधीच्या पहाटे 3.20 ऐवजी 3 वाजून 4 मिनिटांनी दाखल होणार आहे. पूर्वी कोकणकन्या एक्स्प्रेस दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी मडगावला पोहचत होती. नव्या बदलानुसार सुपरफास्ट झाल्यावर सकाळी 9.46 वाजता मडगावला पोहचणार आहे.
मडगाव-हापा एक्स्प्रेसला नडियाद स्थानकात थांबा
कोकण मार्गे धावणाऱया मडगाव-हापा साप्ताहिक एक्स्प्रेसला वडोदरा व अहमदाबाद या प्रमुख स्थानकांच्या दरम्यान असलेल्या नडियाद स्थानकात 23 सप्टेंबरपासून थांबा वाढवण्यात येणार आहे. मडगाव-हापा मार्गावर असताना ही एक्स्प्रेस या स्थानकात रात्री 2 वाजून 43 मिनिटांनी 2 मिनिटांचा थांबा घेवून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.