वृत्तसंस्था /दोहा
उरुग्वे व दक्षिण कोरिया यांच्यात गुरुवारी झालेला विश्वचषकातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
एज्युकेशन सिटी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण कोरियाच्या हय़ुंग मिन सॉनने कॉर्नरवर गोलच्या दिशेने शानदार फटका मारला होता. पण उरुग्वेने तो क्लीअर केल्याने हा गोल होऊ शकला नाही. कोरियाने वारंवार उरुग्वेच्या हद्दीत चढाया केल्या. पूर्वार्धात उरुग्वेचा कर्णधार दिएगो गॉडिनने हेडरवर गोलच्या दिशेने फटका मारला होता. पण तो बारला लागून गेला तर हवांग युइ जो हादेखील कोरियाचा गोल नोंदवण्याच्या अगदी जवळ आला होता. 24 व्या मिनिटाला हवांगने बॉक्सच्या सेंटरमधून उजव्या पायाने मारलेला फटका खूप उंचावरून गेल्याने ही संधी वाया गेली. त्यानंतर 43 व्या मिनिटाला गॉडिनचा आणखी एक हेडर डाव्या बाजूच्या बारला लागून गेला. यानंतरही दोन्ही संघांना अनेक संधी मिळाल्या. पण सदोष नेमबाजी तसेच भक्कम बचाव यामुळे त्यांना त्या साधता आल्या नाहीत. 28 नोव्हेंबर रोजी द.कोरियाचा सामना घानाशी तर 29 रोजी उरुग्वेचा सामना पोर्तुगालशी होणार आहे.