Tarun Bharat

कोयना प्रकल्पाचे सुरक्षा ऑडीट आवश्यक!

गेली अनेक वर्षे कोयना प्रकल्पाच्या अधिजल भुयारातील सर्जवेलच्या गळतीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे नोव्हेंबरमध्ये पोफळीच्या पूर्वेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये धबधब्यासारखा पाण्याचा विसर्ग वाहू लागला. मात्र आता नवीन वर्षात सर्जवेलची दुरूस्ती होणार आहे. त्यासाठी टप्पा 1 आणि 2 बंद ठेवावे लागणार असून नवीन वर्षात वीजनिर्मितीत 600 मेगावॉटची घट होणार आहे. कोयना प्रकल्पाचे 1976 नंतर सुरक्षा ऑडिट झालेले नाही. मात्र यानिमित्ताने सुरक्षा ऑडिटची गरज निर्माण झाली आहे.

गेल्या चार ते पाच वर्षांपासून कोयना प्रकल्पाच्या अधिजल भुयारातील  सर्जवेलला गळती सुरू आहे. मात्र गळतीचे प्रमाण कमी असल्याने ती दुर्लक्षित राहिली. चिपळूण तालुक्यातील पोफळी गावाच्या पूर्वेला सहय़ाद्रीच्या पर्वतरांगामध्ये पावसाळय़ातही विसर्ग होत होता. मात्र धबधब्याचे पाणी असेल असे समजून कुणी लक्ष दिले नाही. मात्र नोव्हेंबर महिन्यातही विसर्गात वाढ झाल्याने घबराट पसरली. त्यातूनच कोयना धरणाला भगदाड अथवा धरणातील पाण्याला गळती लगल्याच्या वावडय़ा उठल्या. मात्र जलसंपदा विभागाने स्पष्टीकरण देऊन त्याला पूर्णविराम दिला. मुळातच कोयना धरण पूर्व दिशेला व पश्चिमेला कोयना वीज प्रकल्प आहे. वीज प्रकल्पाच्या टप्पा 1 व 2 मधील अधिजल भुयारातील सर्जवेलला गळती लागून झिरपलेले पाणी सह्याद्रीच्या डोंगरदऱयातून वाहत असल्याचे स्पष्ट केले.

यासंदर्भात जलसंपदाचे निवृत्त सचिव आणि कोयना धरणाचे माजी मुख्य अभियंता दीपक मोडक यांनीही स्पष्टीकरण देताना कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱया टप्प्यासाठी नवजा टॉवरमधून जे अधिजल भुयार किंवा हेड रेस टनेल निघते त्या बोगद्याच्या शेवटी एक उल्लोळ म्हणजेच सर्जवेल आहे. या विहिरीपासून पुढे दाब बोगद्यातून पाणी पहिल्या व दुसऱया टप्प्याच्या वीजगृहाकडे जाते. ही सर्जवेल 1960 मध्ये पूर्ण झाली असून ती सह्याद्रीच्या कातळात 100 मीटर खोल आहे. या विहिरीला अर्ध्या मीटर रुंदीचे काँक्रीट अस्तरीकरण आहे. या विहिरीला 60 वर्षे झाली असून तिने अनेक भूकंपाचे धक्के पचवलेले आहेत. मात्र आता काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्यामुळे सर्जवेलमधून हे झिरपलेले पाणी इमर्जन्सी व्हॉल्व्ह टनेल (ईव्हीटी) किंवा आपत्कालीन झडपद्वार भुयारामध्ये जाते आणि तिथून डोंगर उतारावरून बाहेर पडत आहे.

गेली चार ते पाच वर्षे हा प्रकार सुरू असल्यामुळे वीजगृह व कोयना जलाशय किंवा डोंगराला कोणताही धोका नाही. केवळ पाणी वाया जात आहे. हे पाणी साधारण तीन घनफूट प्रतिसेकंद एवढे असावे. पोफळी सर्जवेलची जागा अत्यंत दुर्गम भागात असल्यामुळे तिथे मशिनरी नेऊन दुरुस्ती करणे सोपे नाही. दुरुस्तीसाठी वीजनिर्मिती बंद ठेवावी लागेल आणि दुरुस्ती केवळ उन्हाळ्यातच शक्य असल्याने गेली चार-पाच वर्षे दुरुस्तीचे काम रेंगाळले आहे. मात्र  दिवसेंदिवस गळतीचे प्रमाण वाढत असल्यामुळे सर्जवेलची दुरुस्ती अनिवार्य बनली आहे. गळती काढण्यासाठी सर्जवेल पूर्ण कोरडी केली जाणार आहे. त्यासाठी काही दिवस लागतील. त्यानंतर काँक्रिटीकरण व ते मजबूत होण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

दुरूस्ती दरम्यान पहिल्या टप्प्यातून होणारी वीजनिर्मिती पूर्ण बंद ठेवावी लागणार आहे. कोयना प्रकल्पाचे एकूण चार टप्पे आहेत. पहिल्या आणि दुसऱया टप्प्यात पोफळी येथे जलविद्युत केंद्राची उभारणी केली आहे. 70 मेगावॉटचे चार आणि 80 मेगावॉटचे चार असे आठ विद्युतनिर्मिती संच येथे कार्यान्वित आहेत. या दोन्ही टप्प्यातून एकूण 600 मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते. कोयना धरणात दुसरे लेक टॅपिंग करून चौथ्या टप्प्यासाठी स्वतंत्र मार्गाने धरणातील पाणी वळविण्यात आले आहे. त्यामुळे चौथा टप्पा चालू ठेवून पाण्याचा योग्य वापर करून वीजनिर्मिती शक्य आहे. सर्जवेलची गळती काढण्यासाठी ऊर्जा आणि जलसंपदा विभागाचे एकमत झाले आहे. खर्चाची तरतूदही झाली आहे. टप्पा 1 व 2 बंद राहिले तर चौथ्या टप्प्यातून वीजनिर्मिती केली जाणार आहे.

कोयना प्रकल्प महाराष्ट्राचे ‘शक्ति’पीठ म्हटले जाते. 16 मे 1962 रोजी कोयना जलविद्युत प्रकल्पातून निर्मिती सुरू झाली. राज्यातील एकूण जलविद्युत निर्मितीपैकी 59 टक्के वीज कोयना प्रकल्पातून मिळते. या प्रकल्पाला 60 वर्ष पूर्ण झाल्यामुळे प्रकल्पातील यंत्रसामग्री कालबाह्य झाल्याची शक्यता अधिजल भुयाराला लागलेल्या गळतीवरून स्पष्ट झाली आहे. कोयना धरणातील पाणी सर्जवेलमध्ये आणि तेथून वीजनिर्मितीसाठी पाठवले जाते. या बोगद्यांना दिलेले सिमेंटचे आच्छादन निघालेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पाणी काळ्य़ा दगडातून झिरपून डोंगरात जागा मिळेल त्या ठिकाणी बाहेर पडत आहे. त्याचा धोका कोयना प्रकल्पाला नाही मात्र कोयना हे भूकंपप्रवण क्षेत्र आहे. येथे साठ वर्षांत काही हजार भूकंप झाले आहेत. 3 रिश्टर स्केलपेक्षा मोठय़ा भूकंपाची संख्याही खूप आहे. त्यामुळे कालानुरूप काही गोष्टी बदललेल्या असू शकतात. यासाठी स्ट्रक्चरचे सुरक्षा ऑडिट होण्याची गरज दीपक मोडक यांच्यासह अनेक तज्ञांनी मांडली आहे.

कोयना धरण मजबूत स्थितीत आहे. पोफळी, अलोरे आणि कोळकेवाडी येथील वीजनिर्मिती संचाची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती होते. कोयना जलविद्युत प्रकल्पाचा टप्पा 1 व टप्पा 2 ची क्षमतावाढ नुकतीच झाली आहे. दोन्ही प्रकल्पांत पाच मेगावॅटची क्षमता वाढ झाली आहे. त्यामुळे धरण आणि वीजनिर्मिती संचाच्या सुरक्षा ऑडिटचा प्रश्न येत नाही; मात्र धरणापासून वीजनिर्मिती संचापर्यंत पाणीपुरवठा करणाऱया यंत्रणेचे सुरक्षा ऑडिट गरजेचे बनले आहे. हे ऑडिट यापूर्वीच व्हायला हवे होते. मात्र सर्जवेलला गळती लागल्यानंतर हा प्रश्न प्राधान्यक्रमाचा बनला आहे. कोयना धरणातून वीजनिर्मिती संचापर्यंत पाणी नेणाऱया यंत्रणेचे सुरक्षा ऑडिट झाले, तर काही उपाययोजना करणे गरजेचे आहे का, हे लक्षात येईल. अन्यथा धरणातून वीजनिर्मिती संचाकडे पाणी कमी प्रमाणात जाऊन कोयना प्रकल्पाची वीजनिर्मितीची क्षमताच कमी होण्याची भीती आहे.

राजेंद्र शिंदे

Related Stories

सावधान : कोरोनाचा यु टर्न

Omkar B

सार्वजनिक आरोग्याचा विचार ‘एकात्मिक’च हवा!

Patil_p

कोणाच्या सौजन्याने

Patil_p

घननीळा

Patil_p

चित्रपटगृहे अन् डिजिटल चित्रपट

Patil_p

शिक्षण संस्थांची राष्ट्रीय क्रमवारीः एक पाऊल पुढे

Patil_p